
संघाच्या प्रेरणेने चालणाऱ्या एकूण ३२ संघटनांचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीत सहभागी होतील. यामध्ये या संघटनांचे अखिल भारतीय अध्यक्ष, सरचिटणीस, संघटन मंत्री आणि इतर निवडक पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल. या सर्व संघटना अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. सार्वजनिक क्षेत्रांतील विविध प्रश्नांवर उपाययोजना करण्यासोबतच, जनजागृती घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने दीर्घकालीन प्रयत्नांमध्येही निष्ठेने गुंतलेल्या आहेत.
उपक्रमांची अद्ययावत माहिती होणार सादर
या बैठकीत सहभागी प्रामुख्याने आपापल्या उपक्रमांची अद्ययावत माहिती देतील तसेच विविध महत्त्वाच्या मुद्यांवर आपली निरीक्षणे व सूचना मांडतील. विविध संस्थांमधील परस्पर समन्वय व सहकार्य वाढवणे तसेच जनहित आणि धोरणात्मक बाबींवर संवाद साधण्यावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा केली जाईल. या व्यतिरिक्त लोकसंख्याविषयक असंतुलन, व्यसनमुक्तीचे प्रयत्न, तरुणांमध्ये जनजागृती, ‘पंच परिवर्तन’ची अंमलबजावणी आणि विकासाची भारतीय संकल्पना यासारख्या अनेक समकालीन मुद्यांवरही यात चर्चा होण्याची अपेक्षा आहे.