अमरावती
samruddhi-mahamarg समृद्धी महामार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध परिवहन विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. समृद्धी महामार्गाच्या नोडल अधिकारी तथा अमरावतीच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी याबाबत वाहनधारक व वाहनचालकांना विशेष सूचना दिल्या आहेत.

समृद्धी महामार्गावर वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात असल्याने महामार्गावर वाहन बंद पडल्यास अथवा कोणत्याही कारणास्तव वाहन थांबवावे लागल्यास ते सुरक्षित ठिकाणी हलविणे अत्यंत आवश्यक आहे. महामार्गाच्या मुख्य मार्गावर किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी वाहन उभे करणे धोकादायक असून, त्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारची घटना वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर घडली. ९ ऑगस्ट रोजी कंटेनरच्या चालकाने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्ये वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे निदर्शनास आले. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये नागपूर येथून पुणे येथे जाणारा माल लोड असल्याचे निदर्शनास आले. वाहन राष्ट्रीय महामार्गाच्या अटी व शर्तींचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आल्याने संबंधित वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या प्रकरणी वाहन चालकावर वर्धा जिल्ह्यातील सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गावर शासनाच्या निर्देशानुसार वाहतूक सुरळीत व अपघातमुक्त ठेवण्यासाठी नियमित तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. तपासणीदरम्यान महामार्गावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेली वाहने आढळल्यास त्यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने १३ एप्रिल २०२५ रोजी रस्ते सुरक्षा संदर्भात अंतरिम निर्देश निर्गमित केले आहे. या अंतिम निर्देशांचे पालन करीत सार्वजनिक रस्ते व महामार्गांवर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने पार्क करू नयेत, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. वाहन बिघाड झाल्यास चालकांनी तात्काळ वाहन सुरक्षित ठिकाणी हलवावे तसेच संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी. समृद्धी महामार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर भविष्यातही कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा समृद्धी महामार्ग नोडल अधिकारी तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिला असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी अनिल मानकर यांनी कळविले आहे.