लक्ष द्या सुवर्णसंधी सोबत बंपर भरती

SBI मध्ये क्लर्क पदासाठी १५३८ जागांची भरती

    दिनांक :10-Aug-2026
Total Views |
मुंबई
sbi clerk recruitment देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेने (SBI) क्लर्क अर्थात ज्युनिअर असोसिएट भरती २०२६ साठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती अभियानाच्या माध्यमातून तब्बल १५३८ पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
 

sbi clerk recruitment  
SBI क्लर्क भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ७ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २७ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. मात्र, उमेदवाराला केवळ एका राज्यासाठी किंवा केंद्रशासित प्रदेशासाठीच अर्ज करता येईल. संबंधित राज्याची स्थानिक भाषा येणे ही या भरतीसाठी महत्त्वाची अट आहे.
SBI क्लर्क पदासाठी उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत केली जाणार आहे. सर्वप्रथम प्राथमिक परीक्षा म्हणजेच प्रीलिम्स घेतली जाईल. या परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षा अर्थात मेन्सला सामोरे जावे लागेल. मुख्य परीक्षेत यशस्वी ठरणाऱ्या उमेदवारांची अंतिम टप्प्यात लोकल लँग्वेज प्रोफिशिएन्सी टेस्ट (LLPT) घेतली जाईल.
प्राथमिक परीक्षा सप्टेंबर २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे, तर मुख्य परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२६ मध्ये होऊ शकते. या परीक्षांच्या तारखांबाबतची अधिकृत माहिती बँकेकडून जाहीर केली जाणार आहे.
प्राथमिक परीक्षा एकूण १०० गुणांची असून, त्यासाठी उमेदवारांना एक तासाचा वेळ दिला जाणार आहे. प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील आणि परीक्षा तीन विभागांमध्ये घेतली जाईल. चुकीच्या उत्तरासाठी एक-चतुर्थांश गुण वजा केले जातील. विशेष म्हणजे SBI कडून प्रीलिम्ससाठी विभागनिहाय किंवा एकूण पात्रता गुणांची स्वतंत्र अट ठेवण्यात आलेली नाही.
मुख्य परीक्षेसाठी मात्र बँकेकडून निश्चित करण्यात आलेले किमान गुण मिळवणे उमेदवारांसाठी आवश्यक असेल. मात्र, कोणत्याही एका विभागात स्वतंत्रपणे किमान गुण मिळवण्याची अट असणार नाही.
स्थानिक भाषेच्या sbi clerk recruitment प्रावीण्य चाचणीबाबतही महत्त्वाची अट आहे. ज्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावीमध्ये संबंधित राज्याची स्थानिक भाषा विषय म्हणून शिकलेली असेल आणि त्याची नोंद त्यांच्या गुणपत्रिकेत असेल, अशा उमेदवारांना LLPTमधून सूट मिळणार आहे. मात्र, दहावी किंवा बारावीमध्ये संबंधित स्थानिक भाषा शिकलेली नसलेल्या उमेदवारांना निवडीनंतर भाषा प्रावीण्य चाचणी द्यावी लागेल.
या चाचणीमध्ये उमेदवाराची संबंधित स्थानिक भाषा वाचणे, लिहिणे, बोलणे आणि समजून घेणे या चारही बाबी तपासल्या जातील. त्यामुळे ज्या राज्यासाठी उमेदवार अर्ज करणार आहे, त्या राज्याची स्थानिक भाषा अवगत असणे महत्त्वाचे ठरणार आहे.
SBI क्लर्क भरतीसाठी उमेदवाराचे वय १ एप्रिल २०२६ रोजी २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.दरम्यान, अर्ज प्रक्रिया पूर्ण करताना उमेदवारांनी आपला मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी सक्रिय ठेवणे आवश्यक आहे. भरती प्रक्रियेशी संबंधित महत्त्वाची माहिती, सूचना आणि पुढील अपडेट्स उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर किंवा ई-मेलवर पाठवले जाणार आहेत. त्यामुळे अर्ज करताना संपर्काची माहिती अचूक आणि सक्रिय ठेवणे उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.