चंद्रपूर
accident हवेली गार्डन परिसरात नुकत्याच तयार करण्यात आलेल्या सांडपाणी वाहून नेणार्या नालीच्या चुकीच्या आणि निकृष्ट बांधकामाचा गंभीर प्रकार समोर आला असून, सोमवार, 10 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास एका खासगी शाळेची स्कूल बस या नालीत घुसली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वेळीच उपाययोजना केली असती तर ही घटना टाळता आली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
या नालीचे बांधकाम करताना ती पुढील नालीला योग्य पद्धतीने जोडण्यात आली नाही. त्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या अपघाताचा धोका निर्माण झाला होता. दरम्यान, सोमवारी दुपारी एका खासगी शाळेची स्कूल बस या ठिकाणाहून जात असताना चालकाचा अंदाज चुकल्याने बस थेट नालीत घुसली.
या चुकीच्या नाली बांधकामाबाबत रवी जोगी यांनी, यापूर्वीच संबंधित कंत्राटदार, पालिकेचे अधिकारी तसेच स्थानिक नगरसेवकांना वारंवार सूचना व तक्रारी केल्या होत्या. मात्र, संबंधितांनी वेळीच दखल घेऊन आवश्यक उपाययोजना न केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित कंत्राटदार तसेच निष्काळजीपणा करणार्या पालिकेच्या जबाबदार अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रवी जोगी यांनी केली आहे. सदर नालीची तातडीने दुरुस्ती करून योग्य पद्धतीने जोडणी करावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.