मजुमबाई
violence case राहुल नगरमधील विश्वकर्मा कुटुंबाच्या घरात काही दिवसांपूर्वी कौटुंबिक वादातून हिंसक घटना घडली होती. या घटनेत सुनील विश्वकर्मा आणि त्यांचा 14 वर्षीय मुलगा श्लोक यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रकरणातील पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांनी संबंधित घर सील केले होते. मात्र, आज पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास याच सील केलेल्या घरातून धूर तसेच आगीच्या ज्वाळा बाहेर येताना दिसून आल्याने परिसरात खळबळ उडाली.
घरातून आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळ अथक प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत घराचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, आगीत सिलिंडरचा स्फोट झाल्याने घटनास्थळी आणखी सतर्कता बाळगावी लागली.
पोलिसांनी सील केलेल्या घरात आग नेमकी कशी लागली, याबाबत आता प्रश्न उपस्थित झाले आहेत. आगीमागे शॉर्टसर्किट किंवा अन्य कोणते तांत्रिक कारण होते का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. तसेच या आगीच्या घटनेचा काही दिवसांपूर्वी घडलेल्या हत्याकांडाशी काही संबंध आहे का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत. अग्निशमन दलाने परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.दरम्यान, सुनील विश्वकर्मा यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या दोन भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेत आणखी दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सील केलेल्या घराला लागलेल्या आगीचे नेमके कारण आणि तिचा आधीच्या हिंसक घटनेशी काही संबंध आहे का, याचा तपास आता पोलिसांसमोर महत्त्वाचा ठरला आहे.