अमरावतीत निलंबित तलाठ्याच्या घरावर गोळीबार

दोघे पोलिसांच्या ताब्यात

    दिनांक :10-Aug-2026
Total Views |
अमरावती
amravati शहरातील गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जिजाऊ कॉलनीत रविवारी रात्री १० वाजता अचानक गोळीबाराचा आवाज आला. निलंबित पटवारी विपुल भानुदास ठाकरे यांच्या घरासमोर मोटारसायकलवरून आलेल्या बुरखाधारी दोन गुन्हेगारांनी अंदाधुंद गोळीबार केल्याने परिसरात खळबळ उडाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी आज, साेमवारी दोघांना ताब्यात घेतले आहे.
 
arrest
 
 घटनेच्या वेळी घरात विपुल ठाकरे, त्यांचे भाऊ शीतल ठाकरे आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. अचानक घराबाहेर गोळीबाराचा आवाज ऐकू आला. कुटुंबीय बाहेर येण्यापूर्वीच हल्लेखोरांनी दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना गोळी झाडता आली नाही. त्यानंतर दोन्ही गुन्हेगार घटनास्थळावरून पळून गेले.
 
घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आणि चौकशी सुरू करण्यात आली. पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित बाईकस्वार दिसत आहेत. दोघांनीही बुरखा घातला होता. बाईकस्वाराचा चेहरा अर्धवट दिसत आहे. मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातातही शस्त्र असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ओळखण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. शहराच्या विविध भागांमध्ये शोधमोहीम राबविण्यात आली. सोमवारी त्यांना ताब्यात घेण्यात आले. विपुल ठाकरे यांच्यावर यापूर्वी गाडगेनगर पोलिस ठाण्यात दाखल प्रकरणातूनच गोळीबारची घटना घडल्याची चर्चा आहे. तपासात योग्य माहिती पुढे येणारच आहे.