जास्त झोप आरोग्यासाठी ठरू शकते घातक

    दिनांक :10-Aug-2026
Total Views |
sleeping भरपूर झोप घेणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते; मात्र गरजेपेक्षा अधिक वेळ झोपण्याची सवय आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते. जास्त झोपेमुळे झोपेचे नैसर्गिक चक्र बिघडून अनियमित झोपेची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे दिवसभर थकवा जाणवण्याची शक्यताही वाढते.
 
 
sleeping
 
अधिक वेळ झोपल्यामुळे शारीरिक हालचाली कमी होतात. त्याचबरोबर चयापचय प्रक्रियेत होणाऱ्या बदलांमुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते. दीर्घकाळ ही सवय कायम राहिल्यास लठ्ठपणा, मधुमेह तसेच हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो.
 
 
 
 परिणाम होऊन तणावात वाढ 
जास्त झोपेचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होऊ शकतो. नैराश्य, चिंता आणि चिडचिडेपणा यांसारखी लक्षणे दिसू शकतात. अधिक झोपेमुळे मूडमध्ये वारंवार बदल होण्याची शक्यता वाढते. काही वेळा एकाग्रता कमी होणे आणि स्मरणशक्तीशी संबंधित अडचणींचाही सामना करावा लागू शकतो.
दररोज नऊ तासांपेक्षा अधिक झोप घेण्याची सवय असल्यास त्याचा रोगप्रतिकारक शक्तीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच झोपेच्या नैसर्गिक चक्रात व्यत्यय आल्यामुळे पुरेशी झोप घेतल्यानंतरही व्यक्तीला दिवसभर थकल्यासारखे वाटू शकते.
अधिक झोपेमुळे डोकेदुखीचा त्रासही होऊ शकतो. त्याचबरोबर दीर्घकाळ एका स्थितीत झोपल्याने स्नायूंमध्ये कडकपणा निर्माण होऊन पाठदुखीची समस्या सुरू होण्याची शक्यता असते.त्यामुळे केवळ झोपेचा कालावधीच नव्हे, तर झोपेची नियमितता आणि गुणवत्ता यांनाही महत्त्व आहे. सतत जास्त झोपण्याची सवय असल्यास किंवा पुरेशी झोप घेऊनही कायम थकवा जाणवत असल्यास त्यामागील कारण समजून घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरू शकते.