मुंबई
avantika express मुंबईकडे येणाऱ्या अवंतिका एक्स्प्रेसमध्ये तीन संशयित प्रवासी असल्याची माहिती सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. एका प्रवाशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर केलेल्या पोस्टची मुंबई एटीएस कंट्रोलने गंभीर दखल घेतली असून, संबंधित यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. या प्रकरणात पुढील पडताळणी सुरू असून, संबंधित व्यक्तींची माहिती तपासली जात असल्याचे समोर आले आहे.
रेल्वे परिसरात किंवा रेल्वेगाडीत कोणतीही संशयास्पद वस्तू, बॅग किंवा पॅकेट आढळल्यास तात्काळ रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा दल किंवा जवळच्या रेल्वे कर्मचाऱ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रवाशांना सातत्याने केले जाते. प्रवाशांनी सतर्क राहून रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याच्या सूचनाही दिल्या जातात. मात्र, आता एक्स्प्रेसमध्ये एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन संशयित प्रवासी असल्याचा दावा करणारी पोस्ट समोर आल्याने सुरक्षा यंत्रणांमध्येही हालचाली वाढल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रतलाम (मध्य प्रदेश) येथून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अवंतिका एक्स्प्रेसमध्ये तीन संशयित प्रवासी असल्याची पोस्ट एका प्रवाशाने सोशल मीडियावर केली. पोस्ट समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर करण्यात आलेल्या या संशयास्पद पोस्टची एटीएसने गंभीर दखल घेतल्याची माहिती समोर येत आहे.
विशाल राणा नावाच्या व्यक्तीने केलेल्या avantika express पोस्टमध्ये रतलाम (मध्य प्रदेश) येथून अवंतिका एक्स्प्रेसच्या S3 कोचमधून तीन संशयित व्यक्ती प्रवास करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे तिन्ही प्रवासी 40 वर्षांखालील असल्याचे पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच, त्यांचे संभाषण संशयास्पद वाटल्याचा दावाही करण्यात आला आहे. संबंधित तिन्ही व्यक्ती बोरिवली येथे उतरल्याचेही पोस्टमध्ये म्हटले आहे.
या पोस्टमध्ये रतलामहून निघालेल्या अवंतिका एक्स्प्रेसमधील S3 कोच आणि सीट क्रमांक 17 व 19 यांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, बोरिवली रेल्वे स्थानकावरील आजच्या CCTV कॅमेऱ्यांच्या रेकॉर्डिंगचे महत्त्व असल्याचेही पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने नमूद केले आहे.
“@AmitShahOffice @AmitShah @DGPMaharashtra @MumbaiPolice Three suspected persons, below 40, got in train at Ratlam MP & departed at Borivali - Avantika express S3-171819 coach just now 6 am. their talks were suspicious. Todays CCTV camera recording on borivali station is important,” अशी पोस्ट ‘VLOKPAL’ या X खात्यावरून करण्यात आली आहे.
सोशल मीडियावरील या पोस्टच्या माध्यमातून मुंबई ATS कंट्रोलला माहिती मिळाल्यानंतर सतर्कता वाढवण्यात आली. मिळालेली माहिती ATS चारकोप युनिटच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली असून, या प्रकरणाची पुढील पडताळणी सुरू आहे. संबंधित व्यक्तींचे मोबाईल क्रमांक तसेच ई-मेल आयडीची माहितीही ATS कडून पडताळली जात असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर करण्यात आलेल्या या दाव्याची सत्यता तपासण्याचे काम सुरक्षा यंत्रणांकडून सुरू असून, या प्रकरणात पुढे काय कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.