यूजीसी नेटची उत्तरतालिका याच आठवड्यात!

एनटीएकडून मोठी घोषणा; लाखो उमेदवारांची प्रतीक्षा संपणार

    दिनांक :10-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
UGC NET answer key this week यूजीसी नेट जून २०२६ परीक्षेला एक महिन्याहून अधिक कालावधी उलटला असून, निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने म्हणजेच एनटीएने जाहीर केलेल्या माहितीनुसार, यूजीसी नेटची तात्पुरती उत्तरतालिका आणि प्रतिसादपत्रिका याच आठवड्यात उपलब्ध करून दिली जाणार आहे.उत्तरतालिका जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ https://ugcnet.nta.nic.in/ वर जाऊन आपल्या लॉगिन तपशीलाच्या मदतीने ती पाहता आणि डाउनलोड करता येईल. उत्तरतालिकेच्या माध्यमातून उमेदवारांना त्यांनी परीक्षेत दिलेल्या उत्तरांची पडताळणी करून संभाव्य गुणांचा अंदाज घेता येणार आहे. एखाद्या उत्तराबाबत आक्षेप असल्यास एनटीएकडून दिलेल्या मुदतीत त्यावर हरकत नोंदवण्याची संधीही मिळणार आहे.
 
 
 
UGC NET answer key this week
 
यूजीसी नेटच्या निकालाला होत असलेल्या विलंबामुळे गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांमध्ये नाराजी होती. सोशल मीडियावर अनेक विद्यार्थ्यांनी एनटीएच्या विलंबावर प्रश्न उपस्थित केले होते. सहाय्यक प्राध्यापकांच्या भरती तसेच पीएचडी प्रवेशाच्या अंतिम तारखा जवळ येत असताना निकाल आणि उत्तरतालिकेबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली होती.या पार्श्वभूमीवर काही उमेदवारांनी ११ ऑगस्ट रोजी एनटीएच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. विद्यार्थ्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर एनटीएने आता उत्तरतालिकेबाबत माहिती जाहीर केली आहे.
 
 
तात्पुरती उत्तरतालिका प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना आपल्या उत्तरांची तपासणी करता येणार आहे. कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरावर आक्षेप असल्यास संबंधित उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने हरकत नोंदवता येईल. त्यासाठी संबंधित उत्तर निवडून त्याच्या समर्थनार्थ आवश्यक पुरावा सादर करावा लागेल. प्रत्येक उत्तरावर आक्षेप नोंदवण्यासाठी २०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. उत्तरतालिकेवरील हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एनटीएकडून अंतिम उत्तरतालिका तयार केली जाईल. त्यानंतर यूजीसी नेट जून २०२६ चा निकाल जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांची वाढती प्रतीक्षा आणि नाराजी लक्षात घेता, निकाल या महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.