मॉस्को,
Ukraine's drone attack on Russia रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होत असताना तातारस्तानमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी निझनेकामस्क शहराला लक्ष्य करण्यात आलेल्या या हल्ल्यात किमान १९ जणांचा मृत्यू झाला असून ३९ हून अधिक जण जखमी झाले आहेत. रशियन अधिकाऱ्यांनी हा हल्ला गेल्या दोन वर्षांतील तातारस्तानमधील सर्वाधिक जीवघेणा हल्ला असल्याचे म्हटले आहे. मॉस्कोपासून सुमारे ६०० मैल पूर्वेला निझनेकामस्क हे रशियातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र मानले जाते. शहरात मोठ्या प्रमाणावर तेल शुद्धीकरण कारखाने आणि पेट्रोकेमिकल उद्योग आहेत. त्यामुळे या भागावर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे सुरक्षा आणि औद्योगिक पायाभूत सुविधांबाबत चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून तातारस्तानमधील औद्योगिक केंद्रांवर हल्ल्यांच्या घटना घडत आहेत.

हल्ल्यानंतर शहराच्या परिसरात मोठे स्फोट झाल्याचे आणि आकाशात धुराचे लोट दिसल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहेत. मात्र, या हल्ल्यात नेमक्या कोणत्या औद्योगिक सुविधा किंवा आस्थापनांना फटका बसला, याची तत्काळ माहिती समोर आलेली नाही. रशियन अधिकारी सध्या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत आहेत.दरम्यान, संघर्षाला तात्पुरता विराम देण्याची शक्यता रशियाने पुन्हा फेटाळून लावली आहे. रशियाचे उप परराष्ट्र मंत्री मिखाईल गालुझिन यांनी स्पष्ट केले की, केवळ युद्ध थांबवणे किंवा संघर्ष गोठवणे हा कायमस्वरूपी तोडगा ठरू शकत नाही. संघर्षामागील मूळ कारणांवर तोडगा काढणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. रशियन वृत्तसंस्था TASS ला दिलेल्या मुलाखतीत गालुझिन यांनी सांगितले की, रशियाची भूमिका कायमस्वरूपी तोडग्याची आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही यापूर्वी अनेकदा हीच भूमिका मांडली असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, संघर्षाची मूळ कारणे दूर केल्याशिवाय तात्पुरता युद्धविराम केवळ पुढील संघर्षाला आमंत्रण देऊ शकतो.गालुझिन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यावरही टीका केली. झेलेन्स्की हे वास्तवापासून दूर जाऊन संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. युक्रेनच्या कारवायांमुळे कीवचे भागीदार मानल्या जाणाऱ्या काही देशांमध्येही असंतोष निर्माण होत असल्याचा दावा गालुझिन यांनी केला.
यावेळी त्यांनी नागरी आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवरील कथित हल्ल्यांचाही उल्लेख केला. जुलै आणि ऑगस्टमध्ये युक्रेनियन सैन्याने ड्रोनच्या माध्यमातून कॅस्पियन पाइपलाइन कन्सोर्टियमच्या म्हणजेच CPCच्या कामकाजाशी संबंधित सुविधांना लक्ष्य केल्याचा आरोप त्यांनी केला. रशियाने या घटनांना दहशतवादी कृत्य संबोधले आहे.CPCचे महत्त्व अधोरेखित करताना गालुझिन यांनी सांगितले की, या पाइपलाइन प्रकल्पाचा कझाकस्तानच्या अर्थव्यवस्थेशी महत्त्वाचा संबंध आहे. या प्रकल्पात अनेक पाश्चात्य तेल आणि वायू कंपन्यांची हिस्सेदारी असल्याने त्यावर होणाऱ्या हल्ल्यांचे आर्थिक परिणाम व्यापक असू शकतात, असा रशियाचा दावा आहे. त्यामुळे या घटनांकडे अमेरिका आणि युरोपीय देशांनी गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा रशियाने व्यक्त केली आहे. रशियाला आशा आहे की आंतरराष्ट्रीय समुदाय या हल्ल्यांना योग्य प्रतिसाद देईल, असेही गालुझिन यांनी म्हटले. अमेरिका आणि युरोपीय देशांचा कीव सरकारवर प्रभाव असल्याचे सांगत त्यांनी या देशांनी आपली भूमिका बजावण्याची गरज व्यक्त केली. कझाकस्तानच्या हिताशी संबंधित बाबींमध्ये दहशतवादाचा मुकाबला करण्याचे महत्त्व रशियाच्या कझाक भागीदारांनाही समजते, असा दावा त्यांनी केला.