मुंबई
water cut continues मुंबईत सध्या लागू असलेली पाणीकपात मागे घेण्याच्या आशेवर पुन्हा पाणी फिरले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमध्ये रविवारी सकाळपर्यंत एकूण ८८.७० टक्के पाणीसाठा नोंदवण्यात आला. गेल्या आठवड्यात या सातही धरणांमधील एकत्रित पाणीसाठा ९० टक्क्यांच्या पुढे गेल्याने मुंबईतील सध्याची पाणीकपात मागे घेतली जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पाणीसाठ्यात पुन्हा घट झाली असून, सध्या सुरू असलेली पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी उर्ध्व वैतरणामध्ये ८०.१४ टक्के, मोडकसागरमध्ये ९९.९९ टक्के, तानसामध्ये ९८.७७ टक्के, मध्य वैतरणामध्ये ९०.५५ टक्के, भातसामध्ये ८६.२८ टक्के, विहारमध्ये १०० टक्के, तर तुळशीमध्ये ९९.८७ टक्के पाणीसाठा आहे. या सातही धरणांचा एकत्रित पाणीसाठा सध्या ८८.७० टक्क्यांवर आहे.
गेल्या आठवड्यात पाणीसाठा ९० टक्क्यांच्या पुढे गेल्यानंतर पाणीकपात रद्द करण्याची मागणीही जोर धरू लागली होती. विशेषतः मुंबईच्या हद्दीत असलेल्या विहार आणि तुळशी या दोन्ही धरणांमधील पाणीसाठा ९० टक्क्यांच्या पुढे गेल्याने मुंबईकरांना पाणीकपातीपासून दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, गेल्या आठवडाभरात पावसाने पुन्हा ओढ दिल्याने धरणांमधील पाणीसाठा कमी होऊ लागला आणि पाणीकपात मागे घेण्याची शक्यता कमी झाली.धरणांच्या पाणीसाठ्यात एक टक्का वाढ झाली, तर त्यातून मिळणारे पाणी साधारण तीन दिवस पुरते. तसेच, ३० सप्टेंबरपर्यंत धरणे १०० टक्के भरली तरच हा पाणीसाठा पुढील मे किंवा जूनपर्यंत, अथवा पाऊस सुरू होईपर्यंत पुरू शकतो. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याच्या तुलनेत आगामी काळात होणारा पाऊस मुंबईच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.यंदा एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जून महिन्याची सुरुवातही त्याच धर्तीवर झाली होती. water cut continues जूनच्या पहिल्या तीन आठवड्यांत पावसाने अपेक्षित जोर धरला नव्हता. त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यांत दमदार पाऊस झाला. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आणि धरणे भरू लागली.
अद्याप पावसाळ्याचे दोन महिने बाकी असून, या कालावधीत किती पाऊस पडतो यावर मुंबईच्या पाणीपुरवठ्याचे भवितव्य अवलंबून आहे. यंदा एल निनोच्या प्रभावाचा विचार करून ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा आणि आगामी पावसाचा अंदाज लक्षात घेता, सध्यातरी मुंबईतील पाणीकपात मागे घेण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.