धक्कादायक...पतीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न

    दिनांक :10-Aug-2026
Total Views |
बारामती
baramati crime वचन घेऊन सुरू झालेल्या प्रवीण आणि शर्मिला यांच्या संसाराचा शेवट इतका भयावह होईल, याची कल्पनाही कुणी केली नसेल. कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला मादक औषध देऊन बेशुद्ध केल्यानंतर क्रिकेटच्या बॅटने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला जिवंत गाडण्यासाठी घरातच ईंट-सिमेंटचा चेंबर तयार केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. मात्र, चेंबर तयार करणाऱ्या मजुरांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि प्रवीण जगताप यांचा जीव वाचला. या प्रकरणी पोलिसांनी त्यांची पत्नी शर्मिला जगताप हिला ताब्यात घेतले आहे.
 

baramati crime  
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारामती शहरातील जामदार रोडवरील इंद्रप्रस्थ सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये 30 जुलैच्या रात्रीपासून 1 ऑगस्टच्या सकाळपर्यंत ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. 41 वर्षीय प्रवीण प्रकाश जगताप हे एका खासगी कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. या प्रकरणात त्यांच्या 38 वर्षीय पत्नी शर्मिला प्रवीण जगताप हिला अटक करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासानुसार, कौटुंबिक वाद झाल्यानंतर शर्मिला हिने प्रवीण यांना मादक औषध दिली. त्यानंतर ते अर्ध-बेशुद्ध अवस्थेत असताना त्यांच्यावर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केल्याचा आरोप आहे. पतीला कायमचे संपवण्याच्या उद्देशाने त्यांना घरातच जिवंत गाडण्याची तयारी करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
यासाठी घराच्या हॉलला लागून असलेल्या गॅलरीत ईंट आणि सिमेंटच्या साहाय्याने चौकोनी चेंबर तयार करण्यात आले. प्रवीण यांना या अर्धवट तयार चेंबरमध्ये टाकून त्यावर कडप्पा दगडाची स्लॅब ठेवून ते बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.मात्र, घरात चेंबर तयार करणाऱ्या मजुरांना या प्रकाराबाबत आधीच संशय आला होता. परिस्थिती संशयास्पद वाटल्याने त्यांनी तत्काळ पोलिस हेल्पलाइनवर फोन करून माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रवीण यांना वाचवले आणि शर्मिला जगताप हिला ताब्यात घेतले.मजुरांच्या सतर्कतेमुळे या धक्कादायक कटाचा वेळीच भांडाफोड झाला आणि प्रवीण जगताप यांचा जीव वाचला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.