अनिल कांबळे
नागपूर
accused-in-custody-commits-suicide यवतमाळ जिल्ह्यातील चोरी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यातील एका फरार आरोपीने हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात असताना विष प्राशन करुन आत्महत्या केली. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या जाचामुळेच आत्महत्या केल्याचा आरोप मृत युवकाच्या कुटुंबियांनी केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित भगत असे मृतकाचे नाव आहे. तो हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतो. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या अमितविरुद्ध यवतमाळ जिल्ह्यातील कळंब पोलिस ठाण्यात चोरी- फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात अमित फरार आहे. त्याला पकडण्यासाठी कळंब ठाण्यातील पोलिस पथक सोमवारी दुपारी ३ वाजता नागपुरात आले. या पथकाने हुडकेश्वर ठाण्यात नोंद करुन तेथून मदतीसाठी महिला पोलिस कर्मचारी सोबत घेतल्या. या पथकाने नंतर अमितच्या घरी छापा घातला. तो तेथे नसल्याने विचारपूस करण्यासाठी पत्नीला ताब्यात घेतले.
पत्नीने ही घडामोड अमितला फोन करून सांगितली. त्याला पोलिसांकडे हजर होण्यास सूचविले. तो पेट्रोल पंपावर असल्याचे कळाल्याने त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिस तेथे पोहचले. मात्र, त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे दिसल्याने त्याला विचारणा करण्यात आली. त्याच्या खिशात विषारी गोळ्या आढळल्याने त्याने त्या खाल्ल्याचे लक्षात येताच त्याला तातडीने मेडिकलमध्ये नेण्यात आले. मात्र, तेथे त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांच्या ताब्यातील (कस्टडीतील) आरोपीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर शहर पोलिस दलात खळबळ उडाली. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी काहीही बोलायला तयार नाहीत.