समर्थांच्या विचारांची आजच्या पिढीला गरज

‘समर्थ’ चित्रपटाच्या कलाकारांचा नागपुरात उपासकांशी संवाद

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
नागपूर,
actors of the film samarth समर्थ रामदास स्वामींचे विचार, दासबोधातील मूल्ये, साधेपणा, शिस्त, भक्ती आणि राष्ट्रभक्ती आजच्या धकाधकीच्या जीवनात नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. याच उद्देशाने ‘समर्थ’ हा चित्रपट साकारण्यात आला असून, या चित्रपटाच्या माध्यमातून समर्थांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी भावना मानस किंकर रवींद्र पाठक यांनी व्यक्त केली.

actors of the film samarth
आगामी ‘समर्थ’ चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक योगेश फुलफागर तसेच कलाकार पुष्कराज चिरपूटकर, शर्वरी जमेनीस आणि हार्दिक जोशी यांनी जयप्रकाशनगर येथील श्रीगुरुमंदिराला सदिच्छा भेट देत उपासक व भक्तगणांशी संवाद साधला. यावेळी रसिका देशमुख उपस्थित होत्या. संजय देशकर यांनी प्रास्ताविकातून चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. सद्गुरुदास महाराजांचे आशीर्वाद ‘समर्थ’ चित्रपटाला लाभले असून, समर्थांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाठक यांनी चित्रपटामागील संकल्पना विशद केली. समर्थ रामदास स्वामींचे विचार आणि दासबोधातील जीवनमूल्ये दृश्य माध्यमातून प्रभावीपणे नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे. आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात समर्थांचे विचार मार्गदर्शक ठरू शकतात. त्यामुळे हा चित्रपट कुटुंबासह तसेच विद्यार्थ्यांनी आवर्जून पाहावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संजय देशकर, मिलिंद खासनिस, राहुल खासनिस, पूजा देशपांडे, मंजुषा हजारनावीस यांच्यासह मोठ्या संख्येने उपासक व भक्तगण उपस्थित होते.