‘क्राइम पेट्रोल’चा नवा अंदाज पाहून चाहतेही शॉक्ड

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
मुंबई
ajay devgn ‘क्राइम पेट्रोल’च्या आगामी नव्या पर्वाचा प्रोमो प्रदर्शित झाला असून, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता अधिकृत दुजोरा मिळाला आहे. अभिनेता अजय देवगण ‘क्राइम पेट्रोल 2026 – क्राइम का करंट सीजन’ या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. त्यामुळे अभिनेता अनूप सोनी यांच्यानंतर अजय देवगण प्रथमच दूरचित्रवाणीवरील सूत्रसंचालकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. अजयला टीव्हीच्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक असून, नव्या प्रोमोमुळे या उत्सुकतेत आणखी भर पडली आहे.
 

ajay devgn to host crime patrol 2026, new promo confirms his television debut as hos 
अनूप सोनी यांनी २०१८ नंतर ‘क्राइम पेट्रोल’चे सूत्रसंचालन केलेले नाही. आता या लोकप्रिय गुन्हेगारी मालिकेची धुरा अजय देवगण सांभाळताना दिसणार आहे. मोठ्या पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा ‘बॉलिवूडचा सिंघम’ अजय देवगण अलीकडेच ‘धमाल ४’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटाला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या.
नव्या ‘क्राइम पेट्रोल’च्या प्रोमोमध्ये अजय देवगण म्हणतो, “बचपन में हमें सिखाया जाता है अजनबियों से बचकर रहना, रात को घर का ताला लगाना है, पर अब जो हो रहा है और ऐसे बहुत सारे केस हैं। जन्म लेने वाला कोई अनजान नहीं, अपना होता है, जिन्हें हमारे घर का रास्ता भी पता होता है। कभी-कभी चाबी भी होती है और डाइनिंग टेबल पर कुर्सी भी.” पुढे तो म्हणतो, “कई केस में अपना ही खून और शॉकिंग.”
या प्रोमोमधून नव्या पर्वाची संकल्पना स्पष्ट होत असून, समाजाला हादरवून सोडणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनांवर या पर्वात विशेष भर दिला जाणार असल्याचे दिसते. प्रोमोमध्ये अजय सांगतो की, नव्या पर्वात देशाला हादरवून सोडणाऱ्या अनेक प्रकरणांचा वेध घेतला जाणार आहे. “ऐसे ही कुछ केस में मैं आपके साथ रहूंगा। क्राइम पेट्रोल के नए सीजन में हम साथ मिलकर समझेंगे,” असे तो म्हणतो.
‘क्राइम पेट्रोल’चे हे नवे पर्व सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ पासून सोनी लिव्ह आणि सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर सुरू होणार आहे. त्यामुळे अजय देवगणच्या सूत्रसंचालनातील या नव्या पर्वाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, अनूप सोनी यांनी २०१० मध्ये ‘क्राइम पेट्रोल’शी जोडले गेल्यानंतर अनेक वर्षे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अखेर २०१८ मध्ये त्यांनी हा शो सोडला. त्यांनी हा लोकप्रिय क्राइम शो सोडण्याचा निर्णय का घेतला, याबाबत त्यावेळी विविध चर्चा रंगल्या होत्या. शो सोडण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना अनूप सोनी यांनी ‘स्पॉटबॉय’ला सांगितले होते की, त्यांना काही काळ दूरचित्रवाणीपासून दूर राहायचे होते. आपल्या अभिनयातील कौशल्याला आणखी पैलू पाडून ते पुढील स्तरावर नेण्याची त्यांची इच्छा होती.
‘क्राइम पेट्रोल’चे सूत्रसंचालन सोडल्याची आपल्याला उणीव भासत नाही, असेही अनूप सोनी यांनी स्पष्ट केले होते. “मी वारंवार तेच काम करत होतो. मी किती काळ हत्या, बलात्कार आणि मालमत्तेशी संबंधित वादांबद्दल बोलत राहणार?” असा सवाल त्यांनी केला होता. मात्र, सूत्रसंचालकपद सोडल्यानंतरही अनूप सोनी यांची ‘क्राइम पेट्रोल’शी पूर्णपणे फारकत झाली नाही. कार्यक्रमातील काही विशेष सीक्वेन्ससाठी निर्मात्यांनी त्यांना पुन्हा सहभागी करून घेतले होते.
आता अजय देवगण या कार्यक्रमाची सूत्रे हाती घेणार असल्याने ‘क्राइम पेट्रोल’च्या नव्या पर्वाचे स्वरूप आणि त्यातील मांडणी कशी असेल, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.