मालेगाव,
banned gutkha अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मालेगाव शहरातील दोन ठिकाणी छापा टाकून प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्यासह सुमारे १८ लाख ८५ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल १० ऑगस्ट रोजी जप्त केला. या प्रकरणी बंडू ऊर्फ नंदलाल नारायण यादव याच्याविरुद्ध मालेगाव पोलिसांनी १० ऑगस्ट रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
प्रतिबंधित गुटख्याची विक्री व साठवणूक होत असल्याच्या गोपनीय माहितीवरून अमरावती येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शहरातील भेरा रोडवरील मयूर इलेट्रॉनिस समोरील गोडाऊन, तसेच कृष्णा ट्रेडर्स या दुकानावर छापा टाकला. या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याचा साठा आढळून आला. संबंधित ठिकाणे बंडू ऊर्फ नंदलाल नारायण यादव याच्या मालकीची असल्याचे तपासात समोर आल्याने अन्न सुरक्षा अधिकारी घनश्याम पंजाबराव दंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई अमरावती येथील अन्न सुरक्षा अधिकारी संदीप सूर्यवंशी, डॉ. विजय घोंगे व घनश्याम दंदे यांच्या पथकाने केली. यावेळी वाशीम येथील अन्न व औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, मालेगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग इंगळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी सहभागी झाले.
भेरा रोडवरील गोदामात पथक पोहोचले असता ते कुलूपबंद असल्याचे आढळले. पंचांसमक्ष गॅस कटरच्या साहाय्याने कुलूप तोडून पथकाने गोडाऊनमध्ये प्रवेश केला. यावेळी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आढळून आला.banned gutkha गोडाऊनजवळ उभ्या असलेल्या एमएच ३७ टी २४०४ आणि एमएच १४ एचजी ८८५७ क्रमांकाच्या वाहनामध्येही गुटख्याचा साठा आढळला. दोन्ही वाहनांच्या चाव्या उपलब्ध नसल्याने खासगी वाहनाच्या साहाय्याने ती टोईंग करून मालेगाव पोलिस ठाण्यात आणण्यात आली. राज्यात बंदी तसेच कारवायांचा धडाका सुरू असतानाही लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा साठा मालेगावात आढळल्याने हा साठा नेमका कुठून आणण्यात आला, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.