नाल्यावरील स्लॅब तोडले

काचीपुरा, शंकरनगरमधील चार बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
नागपूर.
drain slab रस्ते आणि नाले मोकळे करणारच या निर्धाराने आज नागपूर महानगरपालिकेच्या प्रवर्तन विभागाने शहरभर एकाच वेळी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली. नाल्यावर केलेले बेकायदेशीर स्लॅबचे बांधकाम तोडताना ढाबा व्यवस्थापकाने अडथळा आणला. त्यामुळे त्याला थेट अटक करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई उपायुक्त मंगेश खवले, सहायक आयुक्त संजय कांबळे आणि राजकुमार मेश्राम यांच्या मार्गदर्शनात पार पडली.
 

drain slab 
 
 
स्लॅब जेसीबीने तोडले
आजच्या कारवाईचा सर्वांत मोठा भाग पूर्व शंकरनगर आणि काचीपुरा परिसरात होता. येथील केंद्रीय अतिक्रमण पथक क्र. २ आणि धरमपेठ झोन पथकाने संयुक्त कारवाई केली. उच्च न्यायालयाच्या ४ ऑगस्ट २०२६ च्या आदेशानुसार खालील ४ ठिकाणी नाल्यावर बांधलेले अनधिकृत स्लॅब तोडण्यात आले.
-कॉर्नर हाऊस ढाबाकडे जाणारा मार्ग
-अपना ढाबा, एनएच-१ कडे जाणारा मार्ग
-जगदीश सावजीसमोरील मार्ग
-साई वाटिकाकडे जाणारा मार्ग
प्रवर्तन विभागाच्या पथकाने जेसीबी मशीनच्या साहाय्याने हे सर्व स्लॅबचे बांधकाम जमीनदोस्त केले आणि नाला मोकळा केला. साई वाटिकाचा व्यवस्थापक तालेवार याने कारवाईत अडथळा आणला आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे तातडीने अतिरिक्त पोलिस बंदोबस्त बोलावून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
सीताबर्डीतील मुख्य बाजारपेठेत मोहीम
पथक क्र. ३ आणि ५ यांनी सीताबर्डी मेन रोड ते व्हेरायटी चौक आणि पुन्हा सीताबर्डी मेन रोडपर्यंत संयुक्त कारवाई केली. रस्त्याच्या आणि फुटपाथच्या दोन्ही बाजूला लागलेले सर्व अवैध ठेले, हातगाड्या आणि दुकाने हटवण्यात आली. दिवसभर ही कारवाई सुरू होती.
महाल-गडकरी वाडा भागातही धडक कारवाई
पथक क्र. १ आणि ४ यांनी महाल चौक ते बडकस चौक, केळीबाग रोड, गडकरी वाडा परिसर ते कल्याणेश्वर मंदिर या संपूर्ण भागात कारवाई केली. येथेही रस्त्यावर आलेले अतिक्रमण हटवून वाहतूक मोकळी करण्यात आली.