गोंदिया
caught-in-acb-net रेती उपसा व वाहतुकीप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका वनपालासह दोन वनरक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी ११ ऑगस्ट राजोली सहवनक्षेत्र, परसटोला येथील वन कार्यालय परिसरात करण्यात आली. रमेश सखाराम पचारे (५७), वनपाल, राजुली सहवनक्षेत्र, वनपरिक्षेत्र गोठणगाव, निलोत्पल हिरालाल शिकारे (३१), वनरक्षक, पारसटोला आणि चिंटू मंगलसिंग परिहार (३८), वनरक्षक, राजुली सहवनक्षेत्र अशी ताब्यात घेण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराचे घराचे बांधकाम सुरू असून मार्च २०२६ मध्ये घरासाठी आवश्यक रेती गावालगतच्या नाल्यातून ट्रॅक्टरने आणत असता वनपाल पचारे यांनी ट्रॅक्टर अडवून रेती उपसा व वाहतुकीप्रकरणी कारवाई करण्याची धमकी देत कारवाई न करण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी केली होती. तर ९ जुलै रोजी तक्रारदार रॉयल्टीची रेती घराकडे टाकून ट्रॅक्टर शेताकडे घेऊन जात असताना पचारे व शिकारे यांनी ट्रॅक्टर अडवून चावी काढून घेतली. तसेच गुन्हा दाखल न करण्यासाठी पुन्हा २५ हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास कारवाई करण्याची धमकीही दिली. यानंतर ५ ऑगस्ट रोजी पचारे यांनी तक्रारदाराची भेट घेऊन ८ ऑगस्ट रोजी परसटोला राऊंड ऑफिसमध्ये हजर राहण्याची नोटीस दिली. त्यानुसार तक्रारदार कार्यालयात पोहोचला असता पचारे व शिकारे यांनी ‘सेटलमेंट’ करण्याचे सांगत २५ हजारांऐवजी २० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १० ऑगस्ट रोजी गोंदिया येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
याआधारे पथकाकडून ११ ऑगस्ट रोजी सापळा कारवाई करण्यात आली असता आरोपी पचारे, शिकारे व परिहार यांनी रेती उपसा व वाहतुकीप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी करून तक्रारदाराकडून वनपाल रमेश पचारे याने २० हजार रुपयांची लाख स्विकारली. दरम्यान, लाच लुचपत पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. तर निलोत्पल शिकारे व चिंटू परिहार हे दोघेही घटनास्थळी उपस्थित असल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी किशोरी पोलिस ठाण्यात तिन्ही आरोपी लोकसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करीत आहे.