वडेगावातील ‘त्या’ टाकीतील दूषित पाणी पुरवठा बंद

आरोग्य विभागाच्या ग्रामपंचायतीला सूचना

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
गोंदिया
contaminated-water-supply देवरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला अंतर्गत येणार्‍या वडेगाव येथे दूषित पाणी पुरवठ्यामुळे अतिसाराची साथ उद्भवली असून गेल्या पाच दिवसात 45 जणांना या आजाराची लागण झाल्याचे पुढे आले. दरम्यान, आरोग्य विभागाकडून याची दखल गावातच आरोग्य कॅम्प लावून बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून आरोग्य विभागाच्या निर्देशावरून सदर टाकीतून गावात होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.
 
water tank
 
वडेगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. यासाठी गावात तीन बोअरवेल, तीन सौरपंप तसेच नळ योजनांच्या दोन पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. मात्र, पाण्याच्या टाक्यांची नियमित साफसफाई व देखभाल होत नसल्याने दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दूषित पाण्याचा वापर केल्यानंतर अनेक ग्रामस्थांना उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला काही जणांना ही लक्षणे दिसून आली. मात्र रुग्णांची संख्या वाढत गेल्याने आरोग्य विभागाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेत गावात आरोग्य कॅप्म उघडून उपचार सुरु करण्यात आले.
 
दरम्यान, 10 ऑगस्ट रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी वडेगावला भेट देवुन तेथील आरोग्य सेवा व प्रतिबंधात्मक उपाययोजनेची माहीती घेतली. गावात पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे आवश्यक क्लोरिनेशन व पाणी नमुने तपासणी साठी पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्याच बरोबर ग्रामपंचायत प्रशासनाला पाण्याच्या टाक्यांची तातडीने स्वच्छता, पाईपलाईन व नळ दुरुस्ती तसेच साफसफाई करण्याच्या सुचना दिल्या. तर ज्या टाकीतून दुषित पाण्याचा पुरवठा झाला त्या टाकीतील पाणी पुरवठा पुर्णतः बंद करण्याचे निर्देश दिले. जोपर्यंत पिण्यायोग्य पाणी उपलब्ध होणार नाही तोपर्यंत पाण्याचा पुरवठा करू नये अशा सुचना दिल्या आहे.
साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क व अ‍ॅक्शन मोडवर असुन पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, सर्दी, खोकला आणि गॅस्ट्रोसारख्या संसर्गजन्य आजारांचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे.
-डॉ.अभिजीत गोल्हार, जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया