मुंबई
dashami भारतीय संस्कृतीत विजयादशमीला विशेष महत्त्व आहे. हा केवळ सण नसून अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट शक्तींवर स्त्रीशक्तीच्या विजयाचा शाश्वत संदेश देणारा दिवस मानला जातो. भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून धर्माची स्थापना केली, तर आदिशक्ती देवी दुर्गेने महिषासुराचा संहार करून शक्ती, धैर्य आणि विजयाचा नवा अर्थ संपूर्ण सृष्टीला दिला. याच विजय, शक्ती आणि परिवर्तनाच्या विचारांना समर्पित केएनके बॉक्स प्रस्तुत ‘दशमी’ हा मराठी चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले आहे.
विजय, शक्ती आणि संघर्षाची झलक दाखवणाऱ्या ‘दशमी’च्या पहिल्या पोस्टरचे नुकतेच अनावरण करण्यात आले. प्रत्येक संघर्षातून उभा राहणारा विजय म्हणजेच खरी ‘दशमी’, हा विचार प्रभावीपणे मांडणाऱ्या या चित्रपटात अभिनेता महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, विजय निकम, अभिनेत्री गौरी इंगवले, प्रसन्न केतकर, देवेंद्र गायकवाड, शाम माशाळकर, राज कुंदन आणि ‘दाक्षिणात्य स्टार’ रवि प्रकाश हे नामवंत कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले म्हणाले, ‘दशमी’ हा असा विचार आहे, जो प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक कुटुंबाला आत्मविश्वास आणि बळ देतो. ‘दशमी’ हा केवळ एक चित्रपट नसून प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य आणि सत्याच्या विजयाचा प्रवास आहे. भारतीय संस्कृतीत विजयादशमी हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. याच विचाराला आजच्या काळातील सामाजिक वास्तवाशी जोडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांना केवळ मनोरंजन न देता विचार करायला लावणारा आणि मनात दीर्घकाळ घर करणारा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ऑक्टोबरमध्ये ‘दशमी’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचा संपूर्ण टीमला विशेष आनंद आहे.’
बॉलिवूड चित्रपटांप्रमाणे भव्य दृश्यरचना आणि उच्च दर्जाचे तांत्रिक सादरीकरण हे ‘दशमी’चे विशेष आकर्षण असणार आहे. चित्रपटातील प्रत्येक फ्रेम बारकाईने साकारण्यात आली असून, ‘दशमी’ची कथा रहस्याच्या अनेक स्तरांमध्ये गुंफण्यात आली आहे. कथानकातील धागेदोरे सहजासहजी उलगडत नसल्याने प्रत्येक टप्प्यावर निर्माण होणारे नवे प्रश्न, अनपेक्षित वळणे आणि धक्कादायक खुलासे प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आहेत.
चित्रपटाच्या लेखन आणि संगीताची जबाबदारी सुरेश पंडित यांनी सांभाळली आहे. सस्पेन्स-क्राईम थ्रिलर या प्रकारात मराठी चित्रपटसृष्टीसाठी नवा मापदंड निर्माण करण्याची क्षमता असलेला ‘दशमी’ प्रत्येक चित्रपटप्रेमीने मोठ्या पडद्यावर अनुभवावा, असा अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.