नवी दिल्ली
deepti gaud mukherjee केंद्र सरकारने सोमवारी केलेल्या उच्चस्तरीय प्रशासकीय फेरबदलात वरिष्ठ सनदी अधिकारी दीप्ती गौड मुखर्जी यांची नव्या उच्च शिक्षण सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या विनीत जोशी यांची जागा घेणार आहेत. जोशी यांची गेल्या महिन्यात पंचायती राज मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.
सोमवारी रात्री उशिरा कार्मिक मंत्रालयाने यासंदर्भातील घोषणा केली. यापूर्वी जोशी यांच्या जागी पशुपालन व दुग्धव्यवसाय विभागाचे सचिव नरेश पाल गंगवार यांची उच्च शिक्षण सचिवपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) २३ जुलै रोजीच्या आदेशात अंशतः बदल करून दीप्ती गौड मुखर्जी यांची उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यास मंजुरी दिली.मध्य प्रदेश कॅडरच्या १९९३च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) अधिकारी असलेल्या मुखर्जी सध्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या सचिव म्हणून कार्यरत आहेत. कार्मिक मंत्रालयाने सोमवारी रात्री जारी केलेल्या आदेशानुसार, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांची उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती मंजूर केली आहे.
राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा-स्नातक (NEET-UG) प्रश्नपत्रिका गळतीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुखर्जी यांच्यावर सोपविण्यात आलेली ही जबाबदारी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, युवा व्यवहार विभागाच्या सचिव पल्लवी जैन गोविल यांची कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या नव्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या फेरबदलांत आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळ सचिवालयातील विशेष कार्य अधिकारी (OSD) सुशील कुमार लोहानी यांची भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाच्या (IWAI) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाचे सचिव व्ही. एल. कांता राव यांची गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागात विशेष कार्य अधिकारी (OSD) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सचिव अंशुली आर्य पुढील महिन्याच्या अखेरीस निवृत्त झाल्यानंतर राव राजभाषा विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी स्वीकारतील. दरम्यान, राव यांच्या जागी वरिष्ठ सनदी अधिकारी अर्चना वर्मा यांची जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाच्या नव्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.