स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली 'हाय अलर्टवर'

१९ धोकादायक दहशतवाद्यांचे पोस्टर झळकले

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली
delhi on high alert १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी धोक्याच्या शक्यतेमुळे दिल्ली पोलिसांनी संपूर्ण राजधानीत हाय अलर्ट जारी केला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने धोका निर्माण करणाऱ्या १९ दहशतवाद्यांची यादी जाहीर करून दिल्ली पोलिसांनी गर्दीच्या भागांसह राजधानीतील विविध ठिकाणी त्यांचे पोस्टर लावले आहेत. या पोस्टरमध्ये इंडियन मुजाहिदीन, अल-कायदा तसेच विविध खलिस्तानी दहशतवादी संघटनांशी संबंधित संशयितांच्या छायाचित्रांसह त्यांची माहिती देण्यात आली आहे.
 

delhi on high alert ahead of august 15, police put up posters of 19 wanted terrori 
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल, क्राइम ब्रँच, रेल्वे पोलिस तसेच विविध जिल्ह्यांतील पोलिसांसह अन्य सुरक्षा यंत्रणांनाही सतर्क करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनापूर्वी राजधानीतील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, गर्दीच्या ठिकाणी १९ दहशतवाद्यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत.
 
 
या पोस्टरमध्ये इंडियन मुजाहिदीनचा रियाज भटकल आणि शबांदरी मोहम्मद इक्बाल ऊर्फ इक्बाल भटकल यांचा समावेश आहे. अल-कायदाशी संबंधित मोहम्मद शर्जील अख्तर, अबू सुफियान, मोहम्मद उमर आणि सय्यद मोहम्मद अर्शियान यांचीही नावे व छायाचित्रे या यादीत आहेत. मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत ‘खलिस्तान झिंदाबाद फोर्स’चा रंजीत सिंह ऊर्फ नीता आणि परमजीत सिंह पम्मा, ‘खलिस्तान टायगर फोर्स’चा अर्शदीप सिंह ऊर्फ अर्श डाला तसेच ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ (BKI)चा हरविंदर सिंह संधू ऊर्फ रिंडा, वधावा सिंह बब्बर आणि गुरमीत सिंह बग्गा यांची नावे समाविष्ट आहेत.
 
 
या पोस्टरद्वारे दिल्ली पोलिसांनी नागरिकांना विशेष आवाहन केले आहे. यामधील कोणत्याही व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असे पोलिसांनी म्हटले आहे. माहिती देण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या कंट्रोल रूमचा ११२ हा क्रमांक पोस्टरवर देण्यात आला आहे. संबंधित दहशतवाद्यांची ओळख किंवा त्यांचा ठावठिकाणा याबाबत माहिती देणाऱ्यांना बक्षीस दिले जाईल, तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
 
 
दरवर्षी १५ ऑगस्टच्या आधी खबरदारीचा उपाय म्हणून भारत आणि दिल्लीसाठी धोका निर्माण करणाऱ्या वाँटेड दहशतवाद्यांचे अशा प्रकारचे पोस्टर लावले जातात. सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या दहशतवाद्यांची यादी नागरिकांसमोर ठेवण्यामागे त्यांनाही सतर्क ठेवणे आणि एखाद्या संशयिताची ओळख पटल्यास तत्काळ पोलिसांना माहिती मिळणे हा उद्देश आहे.
सार्वजनिक ठिकाणी दहशतवाद्यांचे पोस्टर लावल्यामुळे नागरिक अधिक सतर्क राहतील आणि संशयित किंवा वाँटेड व्यक्तींची ओळख पटविण्यात पोलिसांना मदत होईल, असा पोलिस अधिकाऱ्यांचा विश्वास आहे. त्याचबरोबर रेल्वे स्थानके, बाजारपेठा आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा व्यवस्थाही अधिक मजबूत करण्यात आली आहे.