पोटच्या पोरावर वार करणार्‍या बापाला पोलिस कोठडी

पत्नीच्या विरहात आपल्याच मुलाला संपवले, दुसरा मुलगा गंभीर

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
चंद्रपूर
crime chandrapur पत्नीच्या विरहात निराश झालेल्या बापाने स्वतःच्याच दोन मुलांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी दुर्गापूर परिसरातील शक्तीनगरात घडली. या हल्ल्यात आठ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर बारा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. आरोपी बापाला अटक केल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, त्यास दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
 
crime chandrapur
 
पत्नी श्वेता विभक्त राहत असल्याच्या नैराश्यातून निर्दयी बापाने स्वतःच्याच दोन निष्पाप मुलांच्या गळ्यावर धारदार ब्लेडने वार केले. आरोपी मंगेश बदखल याने केलेल्या या अमानुष हल्ल्यात त्याचा 8 वर्षाचा देवांश बदखल जागीच मरण पावला. तर 12 वर्षांचा मोठा मुलगा रूषांत बदखल गंभीर जखमी झाला. या भयंकर घटनेनंतर स्वतः तीनदा संपवण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर आरोपी मंगेश बदखल यास दुर्गापूर पोलिसांनी अटक केली होती.
मंगळवारी पोलिसांनी आरोपी मंगेश बदखल यास न्यायालयात हजर केले असता, लोक अभिरक्षक कार्यालयाने आरोपीला मोफत विधी सेवा पुरविली. मुख्य लोक अभिरक्षक अ‍ॅड. विनोद बोरसे, सहाय्यक लोक अभिरक्षक अ‍ॅड. अनुपमा फलके यांनी, आरोपीची बाजू मांडली व पोलिस कोठडीसाठी विरोध केला. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य पाहून आणि पोलिसांना तपासाची संधी मिळावी यासाठी न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मंगेश बदखल हा सीटीपीएसमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होता. गेल्या काही महिन्यांपासून मंगेश आणि त्याच्या पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होते. हा कौटुंबिक कलह पराकोटीला गेल्याने शेवटी पत्नी त्याला सोडून वेगळी राहत होती. मंगेशने तिला समजावून परत आणण्याचे वारंवार प्रयत्न केले. मात्र ती परत येण्यास तयार नव्हती. पत्नीच्या या निर्णयामुळे मंगेश अत्यंत नैराश्य होता. या मानसिक स्थितीत, दोन्ही मुलांना संपवून स्वतःही आत्महत्या करायची, असा विचार त्याने केला होता.
सोमवारी सायंकाळी 6.15 वाजताच्या सुमारास शक्तीनगर येथील वसाहतीत कोणीही नसताना मंगेशने दोन्ही मुलांच्या गोळ्यांवर धारदार ब्लेडने जीवघेणा वार केला. काही वेळाने मंगेशचा लहान भाऊ घरी आला असता, त्याला दोन्ही पुतणे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी तातडीने शेजार्‍यांच्या मदतीने दोघांनाही रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती 8 वर्षाच्या देवांशला मृत घोषित केले.
आरोपी बापाचा तीनदा आत्महत्येचा प्रयत्न
दोन्ही मुलांवर हल्ला केल्यानंतर मंगेशने घरातील छताला गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा लहान भाऊ ऐनवेळी घरी पोहोचल्यामुळे मंगेशने मागच्या दाराने पळ काढला. पळताना वाटेत दिसलेल्या विहिरीत उडी घेतली. पण पाणी कमी असल्याने वाचला व स्वतःच बाहेर आला. तिसर्‍यांदा रेल्वेखाली जीवन संपवण्यासाठी त्याने थेट रेल्वे रुळांकडे धाव घेतली. पण तेव्हाच पोलिसांनी त्यास अटक केली. दुर्गापूरचे पोलिस निरीक्षक संतोष शेगोकर पुढील तपास करीत आहे.