महाविद्यालयांमध्ये ‘फाऊंडेशन ऑफ एआय’ विषय अनिवार्य

अमरावती विद्यापीठाचा ऐतिहासिक निर्णय, महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ ठरणार

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
अमरावती
amravati-university तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलणाऱ्या युगात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना भविष्यातील स्पर्धात्मक युगासाठी सज्ज करण्यासाठी अमरावती विद्यापीठाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण व दूरगामी निर्णय घेतला आहे. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये पदवी स्तरावरील पाचव्या सत्रात ‘फाऊंडेशन ऑफ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ हा विषय अनिवार्य करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा क्रांतिकारी निर्णय घेणारे अमरावती विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.
 
amravati
 
विद्यापीठाच्या या नव्या निर्णयानुसार, पदवी अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्रातील सर्व चारही प्रमुख विद्याशाखा मानवविज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा यामधील विद्यार्थ्यांना हा विषय सक्तीचा असणार आहे. या विषयाच्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात मोठी भर पडणार असून ते पदवी स्तरावर असतानाच ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ सारख्या आधुनिक तंत्रज्ञानात सहज पारंगत होतील.
या विषयाची परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर घेतली जाईल. महाविद्यालयांकडून परीक्षा झाल्यानंतर या विषयाचे गुणांकन व ग्रेड्स विद्यापीठाकडे पाठविले जातील. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या अंतिम गुणपत्रिकेत या विषयाची ग्रेड समाविष्ट केली जाणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेला एक अतिरिक्त व्यावसायिक महत्त्व प्राप्त होईल. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे उच्च शिक्षणात आधुनिकतेची जोड मिळाली असून, विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा मिळण्यास मदत होणार आहे. विद्यापीठाने घेतलेल्या या स्तुत्य निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून, सर्व संबंधित महाविद्यालयांनी या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तातडीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
-तंत्रज्ञानाचे क्षेत्र दिवसेंदिवस प्रचंड वेगाने विस्तारत आहे. अशा पृष्ठभूमीवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आगामी काळातील मुख्य तंत्रज्ञान असणार आहे. पदवी स्तरावरच विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाचे धडे मिळाल्यास त्यांच्या ज्ञानात मोठी भर पडेल आणि त्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल बनेल. विद्यापीठाने घेतलेला हा विद्यार्थीभिमुख उपक्रम राज्यातील सर्व महाविद्यालयांनी अत्यंत गांभीर्याने आणि यशस्वीपणे राबवावा, जेणेकरून आपले तरुण विद्यार्थी जागतिक पातळीवर सक्षमपणे उभे राहू शकतील.
- डॉ. मिलिंद बारहाते, कुलगुरू