तरुणीवर सहा नराधमांचा समूहिक लैंगिक अत्याचार

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
पालघर
Gang-rape Palghar पालघर जिल्ह्यातील तलासरी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी घटना समोर आली आहे. आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या एका 19 वर्षीय तरुणीवर सहा नराधमांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असून, या घटनेमुळे तलासरी आणि संपूर्ण पालघर जिल्हा हादरून गेला आहे.
 

Gang-rape Palghar of young woman by six perpetrators 
मिळालेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय पीडित तरुणी तिच्या मित्रासोबत तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर उभी होती. यावेळी दोन मोटारसायकलवरून आलेल्या सहा जणांनी या दोघांना गाठले. नराधमांनी तरुणीला आणि तिच्या मित्राला धमकावून जबरदस्तीने जवळच असलेल्या एका बंद पडलेल्या डाक बंगल्यात नेले. तेथे त्या नराधमांनी तरुणीवर आळीपाळीने सामूहिक लैंगिक अत्याचार केले. या भयंकर प्रकारानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.घटनेनंतर पीडित तरुणीने तातडीने तलासरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. तरुणीच्या तक्रारीवरून तलासरी पोलिसांनी सहा आरोपींविरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. विशेष पथके स्थापन करून पोलिसांनी अवघ्या काही तासांतच सहापैकी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलीस अधीक्षकांनीही भेट दिली असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती तलासरी पोलीस निरीक्षक अजय गरुड यांनी दिली.