अनेक आजारांनी ग्रस्त सिंहाला वाचवण्यात अपयश

गोरेवाडा केंद्रातील सिंह ‘भारत’चा उपचारादरम्यान मृत्य

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
नागपूर,
gorewada lion संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून गोरेवाडा वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रात आणलेल्या सिंहाचा सोमवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्य झाला. गोरेवाडा केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, अनेक आजारांनी ग्रस्त या सिंहाला वाचवण्यात अपयश आले.
 

gorewada lion bharat dies during treatment after suffering from multiple illnesses 
मुख्यत: अर्धांगवायू व इतर संसर्ग झाल्यामुळे बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात उपचार केले जात होते. अनेक संसर्गजन्य आजारांनी ग्रस्त या सिंहावर योग्य उपचार झाले नसल्याचे वैद्यकीय अहवालात नमुद करण्यात आल्यामुळे वन विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सिंहाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून गोरेवाड्यात नेण्याची वेळ आली तेव्हा गोरेवाड्यातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
या सिंहाच्या मागील पायाला दुखापत झाली असल्याने क्ष-किरण तपासणीत पायाचे हाड मोडल्याचा निष्कर्ष समोर आला होता. उपचारानंतर काही प्रमाणात सुधारणा झाली, मात्र मार्च महिन्यात पुन्हा प्रकृती खालावली होती. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयाकडून या सिंहाच्या स्थलांतराची परवानगी मिळाल्यानंतर वातानुकूलित पशू रुग्णवाहिकेतून त्याला नागपुरात गोरेवाडा येथे आणले होते. तब्बल अडीच महिने गोरेवाडा वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या सिंहाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्याचा प्रवास थांबला. सोमवारी दुपारी २ वाजता या सिंहाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचे शवविच्छेदन वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रात केले. त्यानंतर गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक पांडुरंग पाखले व इतर वनरक्षकांच्या उपस्थितीत या सिंहाचे दहन करण्यात आले.