मुंबई
govinda बॉलिवूडचे ६२ वर्षीय ज्येष्ठ अभिनेते गोविंदा सध्या त्यांच्या आगामी ‘रूपा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. मात्र, चित्रपटाच्या चर्चेसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. गोविंदा नुकतेच ‘रूपा’ चित्रपटातील सहकलाकार आणि अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार यांच्यासोबत मुंबई विमानतळावर दिसले. दोघेही एकत्र चालताना दिसल्याने त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहेत. विशेष म्हणजे, हे आरोप अन्य कुणी नव्हे तर गोविंदांच्या पत्नी सुनीता आहुजा यांनीच यापूर्वी केले आहेत. गोविंदांवर विवाहबाह्य संबंधांचे आरोप होत असताना, त्यांच्या आणि कोमल राणी यांच्या मुंबई विमानतळावरील छायाचित्रे व व्हिडिओंबाबत पापाराझींनी सुनीता यांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी अत्यंत कठोर आणि काहीसे गूढ शब्दांत प्रतिक्रिया दिली.
सुनीता यांनी स्पष्ट केले की, आता गोविंदांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यात त्यांना कोणताही रस नाही. उलट, या प्रकरणाचे उत्तर गोविंदांचे चाहते आणि माध्यमांनीच द्यावे, असे त्यांनी म्हटले.गोविंदांच्या अलीकडील छायाचित्रांबाबत प्रतिक्रिया देताना सुनीता म्हणाल्या, “ही म्हण कधी ऐकली आहे का, विनाशकाले विपरीत बुद्धी. बुद्धी भ्रष्ट झाली आहे म्हणून हे सगळं करतोय तो. आता काय बोलू?” सोशल मीडियावर गोविंदांना ‘चीटर नंबर वन’ म्हणून ट्रोल केले जात असल्याबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुनीता यांनी, “हा प्रश्न मला गोविंदांच्या चाहत्यांना विचारायचा आहे. जेव्हा मी काही बोलते तेव्हा सगळे मला ट्रोल करतात. आता मला गोविंदांचे चाहते आणि माध्यमांनीच उत्तर द्यावे. मला विचारू नका, मला यात काहीच रस नाही,” असे स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, गोविंदांच्या अलीकडील एका वक्तव्यामुळेही या चर्चेला पुन्हा हवा मिळाली आहे. एका मुलाखतीत आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीच्या दिवसांची आठवण सांगताना गोविंदांनी आपण वयाच्या ३४ वर्षांपर्यंत अत्यंत “निष्पाप” होतो, असे म्हटले होते. आपल्या तरुणपणीच्या सरळ स्वभावाची आठवण झाली की आजही आपल्याला संकोच वाटतो, असेही त्यांनी सांगितले. याच संवादादरम्यान त्यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानानेही सोशल मीडियावर चर्चा रंगली. “तुम्ही मिठाईच्या दुकानात राहूनही उपाशी बाहेर पडलात, तर त्यात काय दुःख आहे?” असे ते म्हणाले होते.
व्यावसायिक आघाडीवर गोविंदा आगामी ‘रूपा’ या बहुप्रतीक्षित चित्रपटातून पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ते सध्या व्यस्त असून, त्यांच्यासोबत नवोदित अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अलीकडील वैयक्तिक आयुष्याशी संबंधित चर्चांमध्येच दोघे मुंबई विमानतळावर एकत्र दिसल्याने मनोरंजन क्षेत्रासह सोशल मीडियावरही त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे.