राजस्थान
jaisalmer school bus fire जैसलमेरमधील धऊवा गावाजवळ मंगळवारी सकाळी एसएम पब्लिक स्कूलच्या धावत्या बसला शॉर्ट सर्किटमुळे अचानक भीषण आग लागली. बसमध्ये सुमारे २५ विद्यार्थी प्रवास करत होते. इंजिनच्या भागातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत बस तातडीने थांबवली आणि सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणताही विद्यार्थी किंवा शाळेच्या कर्मचाऱ्याला दुखापत झाल्याची माहिती नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही बस पिथला गावातून विद्यार्थ्यांना घेऊन शहरापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या डाबला रोडवरील एसएम पब्लिक स्कूलकडे जात होती. धऊवा गावाजवळ पोहोचताच बसच्या इंजिनच्या भागातून अचानक धूर निघू लागला. काही क्षणांतच धुराचे रूपांतर आगीच्या भडक्यात झाले आणि बसने पेट घेतला.चालकाने कोणताही विलंब न करता बस रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर बसचा दरवाजा उघडून त्याने एक-एक करून सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढले. स्थानिक ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेत बचावकार्यात मदत केली. विद्यार्थ्यांना बसपासून दूर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. दरम्यान, बस धडाधड जळताना पाहून परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली.घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी प्रयत्नांची शर्थ करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, आग पूर्णपणे विझेपर्यंत बसचा बहुतांश भाग जळून खाक झाला होता. अखेर ही स्कूल बस पूर्णपणे भंगारात रूपांतरित झाली.आगीत विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅग, पुस्तके तसेच बसमध्ये ठेवलेले इतर साहित्य जळून राख झाले. मात्र, सुदैवाने बसमधील कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा कर्मचाऱ्याला इजा झाली नाही. चालकाने वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा जीव वाचला.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राजस्थानमधील उदयपूर येथेही धक्कादायक घटना घडली होती. तेथे काही हल्लेखोरांनी आधी एका कारची तोडफोड केली आणि त्यानंतर एक महिला समोर आल्यानंतर तिला स्कॉर्पिओ गाडीने धडक देत तेथून पलायन केले होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.