मोठा ‘अलर्ट’ लाठीचार्जनंतर झारखंडमध्ये बंदची हाक

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
रांची
jharkhand झारखंडमधील भरती परीक्षांमध्ये कथित अनियमितता झाल्याच्या आरोपावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण मिळाले. विधानसभा घेरावासाठी आलेल्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ भाजपने आज, मंगळवारी (११ ऑगस्ट) ‘झारखंड बंद’ची हाक दिली आहे. JPSC-JSSC भरती परीक्षांतील कथित गैरप्रकारांच्या मुद्द्यावरून राज्यातील विद्यार्थी आंदोलन सुरू असून, सोमवारी आंदोलक विद्यार्थ्यांनी विधानसभेला घेराव घातला. त्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, सरकारने विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
 

jharkhand bandh today as bjp protests police lathicharge on students over jpsc-jssc exam row 
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार गांभीर्याने काम करत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, भाजपने सरकारवर विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसी कारवाईचे उत्तर जनता देईल, असा इशाराही भाजपने दिला आहे.
दरम्यान, भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेच्या प्रकरणात झारखंड लोकसेवा आयोगाचे (JPSC) माजी अध्यक्ष एल. खियांगते यांना झारखंड सीआयडीने सोमवारी अटक केली. राज्याच्या तपास यंत्रणेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक मनोज कौशिक यांनी पीटीआयला सांगितले की, भरती परीक्षांमधील अनियमिततेच्या संदर्भात JPSCचे माजी अध्यक्ष एल. खियांगते यांना अटक करण्यात आली आहे.
राज्याचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाल्यानंतर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये खियांगते यांची झारखंड लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी २२ जुलै रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. JPSCने घेतलेल्या भरती परीक्षांमध्ये कथित अनियमितता झाल्याच्या आरोपावरून उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत असतानाच आयोगाच्या तिन्ही सदस्यांनी राजीनामे दिल्यानंतर अवघ्या एका दिवसाने खियांगते यांना अटक करण्यात आली.
खियांगते यांच्या अटकेनंतर या प्रकरणात सीआयडीने अटक केलेल्या व्यक्तींची संख्या २० झाली आहे. कथित अनियमिततेच्या चौकशीदरम्यान सीआयडी त्यांच्या सरकारी निवासस्थानासह अनेक ठिकाणी झडती घेणार असल्याच्या एक दिवस आधीच त्यांनी JPSC अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करण्यासाठी आपण “स्वेच्छेने राजीनामा दिला”, असे खियांगते यांनी म्हटले होते.