विद्यार्थिनी सर्पदंश प्रकरणी अधीक्षिका चिलमलवार निलंबित

विद्यार्थिनींच्या पार्थिवावर स्वगावी अंत्यसंस्कार

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
गडचिरोली, 
last rites of the female students धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत जमिनीवर झोपलेल्या पाच विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केल्याच्या घटनेत तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संस्थेने कारवाईचा बडगा उगारला आहे. या घटनेस जबाबदार धरून आश्रमशाळेच्या अधीक्षिका भाग्यश्री चिलमलवार यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच चौकशीअंती शाळेतील अन्य काही कर्मचार्‍यांवरही निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
 
 
 
या घटनेमुळे जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनेनंतर काल दिवसभर गडचिरोलीत खळबळ उडाली होती. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, आमदार डॉ. मिलिंद नरोटे तसेच माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
 
 
दरम्यान, मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी केली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत प्रशासनाची मदत न पोहोचल्याने संस्था चालक व कर्मचार्‍यांनी स्वतःच्या जवळील धनादेश देऊन कुटुंबीयांना तातडीची मदत केली. त्यानंतर रात्री उशिरा मृत विद्यार्थिनींचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
 
 
मृतांमध्ये अनु गजूराम कोरेटी (7), दीपिका एकनाथ लकडा आणि सुष्मिता सरोजित मंडल यांचा समावेश आहे. समृद्धी सुरेश नैताम हिच्यावर गडचिरोली येथे उपचार सुरू आहेत, तर दीपिका मडावी हिला हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करून नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
 
 
या संपूर्ण प्रकरणाची विविध अधिकार्‍यांमार्फत चौकशी सुरू आहे. दरम्यान, या घटनेत केवळ आश्रमशाळेतील कर्मचारीच दोषी न धरता आदिवासी विकास विभागाच्या संबंधित प्रकल्प अधिकार्‍यांचीही जबाबदारी निश्‍चित करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.
 
 
मृतक विद्यार्थिनींवर आज अंत्यसंस्कार
सर्पदंशामुळे मृत्यू पावलेल्या तिनही विद्यार्थिनींच्या पार्थिवावर त्यांच्या स्वगावी आज अत्यसंस्कार करण्यात आले. दीपिका एकनाथ लकडा ही एटापल्ली तालुक्यातील जव्हेली येथील विद्यार्थिनी होती. तर सुश्मिता सरोजित मंडल ही एट्टापल्ली तालुक्यातील मेंढरी येथील रहिवासी होती. अनु गजुराम कोरेटी ही धानोरा तालुक्यातील केहकावाही येथील रहिवासी होती. या तिनही मुलींच्या अंत्यसंस्काराला शाळेतील इतर विद्यार्थीसुद्धा उपस्थित होते. अतिशय शोकाकूल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.