मुंबई
manoj jarange patil कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधातील आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या जरांगे पाटील यांनी गेल्या चार दिवसांत सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. २९ ऑगस्टच्या निर्णायक लढ्याची आठवण त्यांनी मराठा समाजबांधवांसह सरकारलाही करून दिली. दरम्यान, आता महायुतीसोबतच त्यांनी काँग्रेसवरही आपला मोर्चा वळवला असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना इशारा दिला आहे. तसेच ओबीसींची बाजू लावून धरणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
मराठा उपसमितीची बैठक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी सरकारला लक्ष्य केले. ‘किती बैठका घेणार अजून? समाजाला काय देताय तुम्ही?’ असा सवाल त्यांनी केला. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटुंबीयांसाठी ऊर्जा खात्याचा साधा एक जीआरही सरकारला काढता आला नाही, असा आरोप त्यांनी केला. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार, असा उलट सवालही त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री दरवेळी छत्रपतींचे नाव घेतात; मात्र सरकारकडून झालेल्या चुकीबद्दल बोलल्यास जनतेचा रोष कमी होईल, असे सांगत जरांगे पाटील यांनी पुन्हा प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. सरकारबद्दल समाजात तिरस्कार वाढत असल्याचा दावा करत त्यांनी हा तिरस्कार आणखी वाढू देऊ नका, असा इशाराही दिला. शेतकरी, मुस्लिम आणि ओबीसी समाजामध्येही तिरस्कार वाढला असल्याचे ते म्हणाले. सरकारने मराठा समाजाला प्रचंड हिणवले असून गेल्या तीन वर्षांत किती मोर्चे झाले आणि त्या काळात समाजाला काय मिळाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मराठा समाज पुन्हा मुंबईकडे जाण्याचा विचार करत असल्याचा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. अनेक मराठा नेते, आमदार आणि खासदार आपल्याला फोन करून आपण मांडत असलेली भूमिका पटत असल्याचे सांगत असल्याचा दावा त्यांनी केला. राणे यांच्यासारखे अनेक मराठा नेते आता बोलू लागले आहेत, याचे स्वागत असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या मुद्द्यावर मोर्चा उघडला असून यापूर्वी त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीकाही केली आहे. यावरून जरांगे पाटील यांनी वडेट्टीवार यांना थेट लक्ष्य केले. ‘माझ्यावर बोलायला राहुल गांधी यांनी तुम्हाला सांगितले आहे का?’ असा सवाल त्यांनी वडेट्टीवार यांना केला.
काँग्रेसची सध्याची परिस्थिती काही नेत्यांमुळे टिकून असल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी थोरात, देशमुख, चव्हाण, सपकाळ आणि नाना पटोले यांचा उल्लेख केला. ‘कशाला तुम्ही खेळ बिघडवताय? बोटावर मोजण्याइतकी काँग्रेस राहिली आहे, तीही संपवू नका. कशाला ती खड्यात घालत आहेत?’ अशा शब्दांत त्यांनी वडेट्टीवारांवर टीका केली.
विजय वडेट्टीवार यांनी कितीही टीका केली तरी मराठा समाज आरक्षण घेणारच, असा निर्धारही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधी पक्षातील नेत्यांवर जरांगे पाटील यांचा आक्रमक पवित्रा कायम असल्याचे दिसून येत आहे.