उमेदच्या महिलांतर्फे मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
वर्धा,
minister jaykumar gore ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ‘उमेद’ मॉल उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तू व उत्पादनांच्या विक्रीसाठी वर्षभर बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात महिला बचत गटांच्या स्वप्नांना भरारी व कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अतिरित मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ यांची उपस्थिती होती.
 
 
minister jaykumar gore
 
महिला सक्षम झाल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून उमेदच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या पंखांना बळ देण्याचे काम सुरू आहे. बचत गटांच्या माध्यमातून लाखो महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या असून त्यांनी स्वतःचे विश्व निर्माण केले आहे, असेही गोरे म्हणाले.
 
 
यावेळी पालकमंत्री डॉ. भोयर यांनी महिला बचतगटांनी मोठ्या मेहनतीने उद्योग उभे केले आहेत. त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उत्पादनांची गुणवत्ता बाजारपेठेतील उत्पादनांशी स्पर्धा करणारी असणे आवश्यक आहे. त्यासोबतच प्रभावी मार्केटिंगचे नियोजनही गटाने करणे गरजेचे आहे. महिला बचत गटांनीही उत्पादनाची गुणवत्ता आणि मार्केटिंग या दोन्ही बाबींवर नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ना. जयकुमार गोरे व पालकमंत्री भोयर यांच्याहस्ते उमेदच्या प्रभाग संघांना समुदाय गुंतवणूक निधीचे तसेच स्वयं सहाय्यता समूहांना बँक लिंकेज निधीचे वितरण करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी उमेद अभियानाच्या जिल्ह्यातील कामाचा आढावा सादर केला. संचालन पल्लवी पुरोहित यांनी केले तर आभार निरज नखाते यांनी मानले.