मुंबई
mumbai local train accident मायानगरी मुंबईत धावत्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली लोकल रेल्वे लाखो मुंबईकरांना दररोज त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचवते. सकाळच्या गर्दीच्या वेळी असंख्य चाकरमानी वेळेत कार्यालय गाठण्यासाठी लोकल पकडण्यासाठी धाव घेतात. मात्र, दिवसेंदिवस वाढणारी प्रवाशांची गर्दी आणि लोकलमधून होणारा धोकादायक प्रवास यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंब्रा खाडी परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत धावत्या लोकलमधून पडून एका २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा खाडी रेल्वे पुलाजवळ धावत्या लोकलमधून पडल्याने साईराज बेणारे या तरुणाचा मृत्यू झाला. साईराजचे वय अवघे २७ वर्षे होते. सकाळी आनंदाने घरातून कामासाठी निघालेला साईराज पुन्हा घरी परतलाच नाही. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच ठाणे-डोंबिवलीदरम्यानच्या रेल्वे प्रवासातील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तसेच रेल्वे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. धावत्या लोकलमधून खाली पडल्यानंतर साईराजचा मृतदेह मुंब्रा खाडीतील एका लोखंडी रॉडमध्ये अडकला होता. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे.
साईराज बेणारे यांचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी छत्रपती महाराज रुग्णालय, कळवा येथे ठेवण्यात आला आहे. या घटनेनंतर लोकल प्रवासातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लोकलमधून प्रवास करताना यापूर्वीही अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने होत आहे.
सकाळच्या वेळेत कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी लोकलने प्रवास करतात. मात्र, प्रचंड गर्दीमुळे अनेक प्रवासी लोकलच्या दरवाज्याला लटकून प्रवास करताना दिसतात. हा धोकादायक प्रवास अनेकदा जीवघेणा ठरला असून अशा घटनांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांनी स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येते.