रात्रीच्या शांततेत जमीन हादरली 'भूकंपाचे' सलग दोन धक्के

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
मुंबई
palghar earthquake पालघर जिल्ह्यातील जव्हार-विक्रमगड परिसरात सोमवारी रात्री भूकंपाचे सलग दोन धक्के जाणवले. या भूकंपांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे ३.२ आणि ३.४ इतकी नोंदवण्यात आली. अवघ्या काही वेळात दोन धक्के जाणवल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
 

palghar earthquake two tremors of magnitude 3.2 and 3.4 hit jawhar-vikramgad area 
पालघर जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पहिला भूकंपाचा धक्का सोमवारी रात्री १० वाजून ४ मिनिटांनी जाणवला, तर दुसरा धक्का रात्री ११ वाजता बसला. या दोन्ही धक्क्यांची तीव्रता अनुक्रमे ३.२ आणि ३.४ इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू जव्हार तालुक्यात जमिनीखाली सुमारे पाच किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सलग दोन धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली. मात्र, भूकंपाची तीव्रता तुलनेने कमी असल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले नाही. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी घाबरून न जाता शांत राहावे आणि भूकंपाच्या वेळी घ्यावयाच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील पालघर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. मागील महिन्यातही जिल्ह्यात भूकंपाचे तीन धक्के जाणवले होते. मुंबईपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यात ३१ जुलै रोजी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला होता. त्याची तीव्रता ३.५ इतकी नोंदवण्यात आली होती. त्यापूर्वी २५ जुलै रोजी मुसळधार पावसादरम्यान डहाणू तालुक्यातील गंजाड परिसरात ३.१ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला होता. २८ जुलैलाही जिल्ह्यात सौम्य भूकंपाची नोंद झाली होती. त्याचा केंद्रबिंदू पाटीलपाडा गावात असल्याचे सांगण्यात आले होते.
याचदरम्यान, दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपामुळे जिल्ह्यातील काही भागांमध्ये घरांच्या भिंतींना तडे गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (एनसीएस) माहितीनुसार, शनिवारी रात्री १० वाजता नाशिकमध्ये ४.३ तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यानंतर रविवारी सकाळी ५ वाजून ३३ मिनिटांनी ३.३ तीव्रतेचा धक्का जाणवला.
महाराष्ट्र-गुजरात सीमेच्या परिसरातील हातगड पर्वतरांगांजवळील भनवड भागात जमिनीखाली सुमारे पाच किलोमीटर खोलीवर ही भूकंपीय हालचाल नोंदवण्यात आली. नाशिक शहरातील काही भागांसह सुरगाणा, कळवण, देवळा, चांदवड, पेठ, दिंडोरी आणि निफाड तालुक्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली होती.
जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरगाणा तालुक्यातील भादर आणि दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे काही घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत.