‘परम प्रज्ञा’मुळे भारताची एआय झेप

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली
param pragya पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांत आयआयटी दिल्लीच्या दीक्षांत समारंभादरम्यान देशातील एआय-सक्षम हाय परफॉर्मन्स सुपरकॉम्प्युटिंग सुविधेचे उद्घाटन केले. ‘परम प्रज्ञा’ नावाची ही सुविधा सामान्य संगणकाच्या तुलनेत लाखो पटीने अधिक वेगाने काम करण्यास सक्षम आहे. सुपरकॉम्प्युटिंगच्या क्षेत्रात भारताची नवी ताकद म्हणून तिच्याकडे पाहिले जात असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मॉडेल्सचे प्रशिक्षण आणि विविध संशोधनासाठी तिचा वापर केला जाणार आहे. ही सुविधा आयआयटी दिल्लीच्या सोनीपत कॅम्पसमध्ये स्थापित करण्यात आली आहे.
 
 

param pragya boosts india
काय आहे ‘परम प्रज्ञा’
‘परम प्रज्ञा’ हा भारताचा अत्याधुनिक सुपरकॉम्प्युटर असून सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग (सी-डॅक)ने तो विकसित केला आहे. ‘परम’ हा शब्द संस्कृतमधून घेतला असून त्याचा अर्थ ‘सर्वश्रेष्ठ’ असा होतो. इंग्रजीमध्ये PARAMचा विस्तार ‘Parallel Machine’ असा केला जातो. भारतातील पहिला सुपरकॉम्प्युटर ‘PARAM 8000’ १९९१ मध्ये लाँच करण्यात आला होता. त्यानंतर देशात अनेक सुपरकॉम्प्युटर विकसित करण्यात आले असून, ‘परम प्रज्ञा’ ही या मालिकेतील अत्याधुनिक प्रणाली आहे. अत्यंत गुंतागुंतीची गणिते आणि प्रक्रिया अतिशय कमी वेळेत पूर्ण करण्याची क्षमता या सुपरकॉम्प्युटरमध्ये आहे.
पुढील पिढीतील तंत्रज्ञानाच्या गरजा लक्षात घेऊन ‘परम प्रज्ञा’ची निर्मिती करण्यात आली आहे. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्सच्या क्षेत्रात त्याचा मोठा उपयोग होणार आहे. मोठ्या एआय मॉडेल्सचे प्रशिक्षण तसेच जटिल मशीन लर्निंग प्रयोग या प्रणालीच्या माध्यमातून करता येणार आहेत. त्याची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंगची क्षमता. सामान्य संगणकाला ज्या गुंतागुंतीच्या गणना पूर्ण करण्यासाठी मोठा कालावधी लागू शकतो, त्याच प्रक्रिया ‘परम प्रज्ञा’ अत्यंत वेगाने पूर्ण करू शकतो.मोठ्या प्रमाणातील डेटावर वेगाने प्रक्रिया करण्याची क्षमताही या प्रणालीमध्ये आहे. त्यामुळे एआय आणि वैज्ञानिक संशोधनाला मोठी मदत मिळणार आहे. एआय-सक्षम हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंगसह जटिल मॉडेल्स हाताळण्याची क्षमता त्यात आहे. या सुपरकॉम्प्युटरचा वापर केवळ संगणकशास्त्रापुरता मर्यादित राहणार नसून अभियांत्रिकी, डेटा सायन्स आणि विविध आंतरविद्याशाखीय संशोधन क्षेत्रांमध्येही केला जाऊ शकतो.
‘परम प्रज्ञा’मध्ये शेकडो प्रोसेसिंग युनिट्स एकाच वेळी कार्य करतात. मोठ्या कामाचे छोटे भाग केले जातात आणि प्रत्येक युनिट स्वतंत्र भागावर एकाच वेळी प्रक्रिया करते. त्यामुळे संपूर्ण काम अत्यंत वेगाने पूर्ण होते. त्यानंतर सर्व युनिट्सकडून मिळालेले निकाल एकत्र करून अंतिम निष्कर्ष तयार केला जातो. परिणामी, अब्जावधी-खरबो गणिते काही सेकंद किंवा काही मिनिटांत पूर्ण करण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे.
या अत्याधुनिक सुपरकॉम्प्युटरमध्ये आधुनिक एआय आणि कम्प्युटिंग हार्डवेअरचा वापर करण्यात आला आहे. त्याची प्रक्रिया क्षमता पेटाफ्लॉप्समध्ये मोजली जाते. एआय अॅक्सिलरेटर आणि जीपीयू क्लस्टरच्या मदतीने डीप लर्निंग मॉडेल्स तसेच लार्ज लँग्वेज मॉडेल्सचे प्रशिक्षण घेणे शक्य होणार आहे. याशिवाय, सुरक्षित आणि वेगवान स्टोरेजची सुविधाही त्यात उपलब्ध आहे. त्यामुळे मोठ्या आकाराच्या डेटा फाइल्सचे जलद विश्लेषण करता येणार आहे.
वैज्ञानिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध कामांसाठी ‘परम प्रज्ञा’चा वापर केला जाणार आहे. हवामान, चक्रीवादळे आणि हवामान बदलाशी संबंधित विविध नमुने तसेच त्यांचे परिणाम यांचे अधिक अचूक विश्लेषण करण्यासाठी या सुपरकॉम्प्युटरची मदत होऊ शकते. वैद्यकीय क्षेत्रातही त्याचा महत्त्वपूर्ण उपयोग अपेक्षित आहे. नवीन औषधांची निर्मिती आणि त्यांच्या चाचण्यांसाठी लागणारा अनेक वर्षांचा कालावधी कमी करण्यास या तंत्रज्ञानाची मदत होऊ शकते.
नवीन यंत्रसामग्री प्रत्यक्षात तयार करण्यापूर्वी तिची त्रिमितीय (3D) रचना संगणकावर तयार करून तिच्या सुरक्षिततेची अचूक तपासणी करणेही शक्य होणार आहे. एरोनॉटिक्स, ऑटोमोबाइल तसेच अन्य क्षेत्रांमध्ये मोठ्या यंत्रसामग्रीची संगणकीय मॉडेल्स तयार करण्यासाठी या सुपरकॉम्प्युटरचा उपयोग केला जाऊ शकतो.
भारतीय भाषांमधील एआय मॉडेल्सचे प्रशिक्षण करण्यासाठीही ‘परम प्रज्ञा’ उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. या सुविधेमुळे भारतीय संशोधकांना गुंतागुंतीच्या वैज्ञानिक आव्हानांवर देशातच उपाय शोधण्यास मोठी मदत मिळू शकते. त्यामुळे एआय, वैज्ञानिक संशोधन, अभियांत्रिकी आणि विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये भारताच्या स्वदेशी उच्च-कार्यक्षमता संगणकीय क्षमतेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.