स्वत:च्याच घरावर गोळीबाराचा कट

सूत्रधार फरार, चार जण गजाआड

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
अमरावती
plot-to-fire-at-ones-own-house अर्जुन नगर येथील विपुल ठाकरे यांच्या घरावर देशी कट्ट्याने गोळीबार करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. शहर गुन्हे शाखा पोलिसांनी या प्रकरणाचा भंडाफोड केला असून विपुल ठाकरे यानेच हा कट रचल्याचे उघडकीस आले आहे.

plot 
गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे, पोलिस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांनी जवळपास १०० पेक्षा अधिक ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या आधारे खात्रीलायक माहिती प्राप्त केली. त्यावरून हा गुन्हा बादशहासिंग अजाबसिंग टांक, अजय नुरजेम भोसले या दोघांनी केल्याचे निष्पन्न झाले. दोघांनाही नागपूर महामार्ग तसेच वडाळी परिसरातून ताब्यात घेतले. त्यांची सखोल विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. विपुल ठाकरे यांनी बादशासिंग अजाबसिंग टांक याला दीड लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. त्या रकमेपैकी १० हजार रुपये चंद्रसिंग उर्फ शेरूसिंग जोधसिंग शाकला याच्या माध्यमातून बादशहासिंग अजाबसिंग टांक, अजय नुरजेम भोसले आणि राजासिंग अजाबसिंग टांक यांना देऊन स्वतःच्याच राहत्या घरावर गोळीबार करून प्राणघातक हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता.
 
सदर कट रचण्याचा नेमका उद्देश काय होता तसेच तो का रचण्यात आला या बाबत ठाकरे याचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी बादशहासिंग, अजय भोसले, राजासिंग अजाबसिंग टांक व चंद्रसिंग उर्फ शेरूसिंग जोधसिंग शाकला यांना अटक केली आहे.