‘हर घर तिरंगा’ला उत्सवाचे स्वरूप द्या

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |

नवी दिल्ली

har ghar tiranga स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक नवा व्हिडीओ संदेश शेअर करत देशवासीयांना ‘हर घर तिरंगा’ अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. ‘हर घर तिरंगा’ हा केवळ अभियान न राहता प्रत्येक घरातील उत्सव बनवावा, असे आवाहन मोदी यांनी केले आहे. यंदा १५ ऑगस्ट रोजी देश स्वातंत्र्याची ८०वी वर्षगाठ साजरी करणार आहे.
 

har ghar tiranga

व्हिडीओ संदेशातून पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना १५ ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन अभिमान आणि सन्मानाने साजरा करण्याचे आवाहन केले. स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली अर्पण करण्यासोबतच विकसित भारताच्या निर्मितीचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

“हर घर में तिरंगा, हर घर में तिरंगा, हर दिल में तिरंगा. आइए, हम हर घर में तिरंगा फहराएं,” असे मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले. “आइए, हर घर तिरंगा को हर घर में एक उत्सव बनाएं,” असेही त्यांनी नमूद केले.

‘हर घर तिरंगा’ अभियान संपूर्ण ऑगस्ट महिन्यात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नागरिकांना आपल्या घरांबरोबरच दुकाने, कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रीय ध्वज फडकविण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. तिरंगा फडकविण्यापुरतेच हे अभियान मर्यादित नसून राष्ट्रीय ध्वजाबद्दल नागरिकांच्या मनात अभिमान आणि भावनिक जिव्हाळ्याची भावना अधिक दृढ करणे हा त्यामागील उद्देश आहे.

केंद्र सरकार तसेच विविध सामाजिक आणि संस्थात्मक संघटनांकडून देशभरात या अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. अनेक ठिकाणी नागरिक सामूहिकपणे तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात सहभागी होत आहेत.

‘हर घर तिरंगा’ अभियानाची सुरुवात ‘आजादी का अमृत महोत्सव’च्या काळात करण्यात आली होती. त्यानंतर दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या आधी या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २०२६ मध्येही नागरिकांना आपल्या घराच्या बाल्कनीत, छतावर किंवा मुख्य प्रवेशद्वारावर तिरंगा फडकविण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. तसेच शेजाऱ्यांसोबत एकत्र येऊन स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’च्या माध्यमातून देशभक्तीची भावना अधिक व्यापक करण्याचा आणि प्रत्येक घराला स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.