झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज; प्रकाश राज संतापले

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
झारखंड
prakash raj देशातील तरुण आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरत असतानाच झारखंडमध्येही विद्यार्थी आंदोलनाचा आवाज बुलंद झाला आहे. ‘सीजेपी’च्या आंदोलनानंतर आता झारखंडमध्येही विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी, १० ऑगस्ट रोजी रांची येथे झारखंड विधानसभेकडे मोर्चा काढणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. विधानसभेबाहेर आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. या कारवाईवर अभिनेते प्रकाश राज यांनी संताप व्यक्त करत पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
 

prakash raj reacts to jharkhand student protest, condemns police lathicharge on jpsc-jssc aspirant 
रांचीमध्ये झारखंड विधानसभेकडे मोर्चा काढणाऱ्या JPSC-JSSC उमेदवारांवर पोलिसांनी तीनवेळा लाठीचार्ज केला. त्यांच्यावर टियर गॅसचाही मारा करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईनंतरही आंदोलक विद्यार्थी मागे हटले नाहीत. स्पर्धा परीक्षांमधील कथित घोटाळ्याच्या चौकशीसह विविध मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
अभिनेते प्रकाश राज यांनी या आंदोलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात येत असल्याचे तसेच त्यांच्यावर टियर गॅसने निशाणा साधला जात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत प्रकाश राज यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘का... का... का...! हे रानटी कृत्य आता चालणार नाही, यामुळे ही अहंकारी सत्ता कोसळणार...’, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. प्रकाश राज यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, आंदोलकांनी स्पर्धा परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या मुद्द्यावर आंदोलन सुरूच ठेवण्याची ठाम भूमिका घेतली असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले असताना पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. या कारवाईचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत.
झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) आणि झारखंड कर्मचारी निवड आयोग (JSSC) यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित मुद्द्यांवर ‘JPSC-JSSC सुधार मंच’ने हे आंदोलन आयोजित केले आहे. पोलिसांच्या कठोर कारवाईबद्दल आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली असून आपला लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.
गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो यांनी सांगितले की, हे आंदोलन केवळ काही विद्यार्थ्यांपुरते मर्यादित नसून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांच्या समस्यांचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे JPSC-JSSC परीक्षांशी संबंधित मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.