वॉशिंग्टन,
priority on opening up hormuz अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्याऐवजी वाटाघाटीचा पर्याय निवडला आहे. शस्त्रसाठ्याच्या कमरतरतेमुळे इराण संघर्ष कोणत्याही परिस्थितीत संपावा आणि सैन्याला या भागातून बाहेर काढण्यावर अमेरिकेचा भर आहे. यासाठी अणुकरारातून माघार घेऊन केवळ होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यावरच ट्रम्प यांचा भर असल्याचा दावा अमेरिकन माध्यमांनी केला आहे.

अमेरिका औपचारिक अणुकराराऐवजी होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सामान्य स्थिती पूर्ववत होण्याला संभाव्य बाहेर पडण्याचा मार्ग मानत आहे. ट्रम्प गेल्या काही आठवड्यांपासून संघर्ष संपवण्याच्या शक्यतांवर काम करत आहे. त्यांनी खासगीत वरिष्ठ सहकाऱ्यांना सांगितले आहे की ते इराणसोबत औपचारिक अणुकराराशिवायही माघार घेऊ शकतात. तथापि, या निर्णयातून सन्मानजनक मार्ग काढणे कठीण झाले असल्याचेही त्यांनी मान्य केले अशी माहिती ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये प्रकाशित वृत्तात म्हटले आहे. होर्मुझ जलमार्गातून नौकानयन पुन्हा सुरू करण्याच्या बदल्यात इराणने अनेक महत्त्वपूर्ण मागण्या केल्या. यामध्ये अब्जावधी डॉलर्सची रक्कम, अमेरिकेची नौदल नाकाबंदी समाप्त करणे, या प्रदेशातून अमेरिकी सैन्याची संपूर्ण माघार आणि इतर मोठ्या सवलतींचा समावेश आहे. या मागण्यांमुळे अमेरिकेचे राजनैतिक पर्याय मर्यादित झाले आहेत. दरम्यान इराण समर्थित हुथी आणि आयआरजीसीने संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरबच्या जहाजांवर केलेल्या हल्ल्यामुळे अमेरिका-इराण यांच्यातील वाटाघाटीची शक्यता अधिक कमी झाली आहे.
२० युद्धनौका तैनात
होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाच्या पृष्ठभूमीवर अमेरिकेने इराणविरुद्धची आपली नाकाबंदी अधिक तीव्र केली. मध्य पूर्वेतील लष्करी मोहिमांसाठी २० हून अधिक अमेरिकन युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने म्हटले की, या मोहिमांमध्ये इराणविरुद्धच्या नाकाबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करणे शक्य होईल. ९ ऑगस्टपर्यंत नाकाबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५५ व्यापारी जहाजांना त्यांचे मार्ग बदलण्यास भाग पाडण्यात आले. दोन जहाजांवर हल्ला करून ती निकामी करण्यात आला, तर दोन जहाजांवर चढून त्यांची तपासणी करण्यात आली.
इराणच्या सत्ता रचनेत फेरबदल
इराणने आपल्या सर्वोच्च सुरक्षा यंत्रणेत मोठा फेरबदल करत, माजी आयआरजीसी प्रमुख मोहसेन रझाई यांची सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर सर्वोच्च नेत्यांचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. रझाई यांचा अनुभव पाहता, हा बदल इराणच्या सुरक्षा धोरणात आणखी कडकपणा आणण्याचे संकेत देतो. रेझाई यांना लष्करी आणि सुरक्षाविषयक बाबींमध्ये व्यापक अनुभव आहे. दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांची भेट घेतली. या बैठकीत देशाच्या लष्करी आणि आर्थिक घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्री अराघची यांनी दिली.