गोंदिया
snakebite and deaths of female students गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत तीन चिमुकल्या विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची गंभीर दखल आमदार संजय पुराम यांनी घेतली असून आश्रम शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, आ. पुराम यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची भेट घेऊन दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवून तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.
सादर निवेदनानुसार, गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी निवासी आश्रम शाळेत विद्यार्थिनींसाठी खाटांची (बेड्स) सोय नसल्याने १० ऑगस्ट रोजी पहाटे २ ते २:३० वाजेच्या सुमारास खाली फरशीवर झोपलेल्या दिपिका लकडा, सुस्मीता मंडळ आणि अनु कोरेटी या तीन निष्पाप विद्यार्थिनींचा विषारी सापाच्या दंशाने दुर्दैवी अंत झाला. तर इतर काही विद्यार्थिनींची मृत्यूशी झुंज सुरू असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ही घटना संबंधित आश्रम शाळा व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे घडली असून विद्यार्थ्यांच्या प्राणांशी खेळणार्या या असंवेदनशील व्यवस्थापनाविरोधात संपूर्ण आदिवासी बहुल परिसरात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. तेव्हा आश्रमशाळा व्यवस्थापन आणि संबंधित जबाबदार अधिकार्यांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड करणार्या जपतलाई आश्रमशाळेची मान्यता रद्द करून ती कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश द्यावेत. राज्यातील सर्वच आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या निवास, खाटा (बेड्स) आणि सुरक्षिततेची तातडीने तपासणी करून कडक सुरक्षा नियम लागू करावेत, अशी मागणीही आ. पुराम यांनी मंत्री उईके यांच्याकडे केली आहे.
निवासी आश्रमशाळेत सुविधांचा अभाव असणे आणि निष्पाप बालकांना फरशीवर झोपावे लागणे ही अत्यंत वेदनादायी व गंभीर बाब आहे. निष्काळजीपणा करणार्या व्यवस्थापनाची गय केली जाणार नाही. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे.
* संजय पुराम, आमदार, आमगाव/देवरी वि.स.क्षेत्र