सोलापूर,
accident involving jarange patils convoy मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्याला महामार्गावर भीषण अपघात झाला. सोलापूर दौऱ्यानंतर विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असताना ही दुर्घटना घडली. ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांवर आदळल्यानंतर मागून आलेल्या भरधाव एसटी बसने ताफ्यातील एर्टिगा कारला जोरदार धडक दिली. या अपघातात एका मराठा कार्यकर्त्याला गंभीर दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांचा ताफा महामार्गावरून जात असताना अचानक पुढील वाहनांना ब्रेक लावावे लागले. त्यामुळे मागून येणाऱ्या ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्याचवेळी मागून वेगाने येणाऱ्या एसटी बसचे नियंत्रण सुटल्याने ती थेट ताफ्यातील एर्टिगा कारवर जाऊन धडकली.
एसटी बसची धडक एवढी जोरदार होती की, एर्टिगा कारच्या पुढील आणि मागील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ताफ्यातील कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. वाहनात अडकलेल्या कार्यकर्त्याला बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित कार्यकर्त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत मनोज जरांगे पाटील सुरक्षित राहिले असून त्यांच्या वाहनाला कोणतीही हानी झालेली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत केली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची कार्यवाहीही करण्यात आली असून, या अपघाताचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.