मुंबई
sunday 1996 मराठी चित्रपटसृष्टीने आपल्या वैविध्यपूर्ण आणि आशयघन कथांमधून सातत्याने प्रेक्षकांसमोर नवे विषय आणि वेगळे अनुभव मांडले आहेत. याच समृद्ध परंपरेत रहस्य, नाती, भावना आणि काळाच्या अनपेक्षित खेळाची गुंफण असलेला ‘संडे १९९६’ हा अनोखा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातील सीमारेषा धूसर करणाऱ्या या चित्रपटाची कथा उत्कंठा वाढवणाऱ्या रहस्याभोवती फिरते.
व्ही.आर.के. फिल्मसची निर्मिती असलेल्या ‘संडे १९९६’ची निर्मिती नीलांबरी विक्रांत यांनी केली असून, लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी जीवन राजेंद्र चव्हाण यांनी सांभाळली आहे. चित्रपटात ओंकार राऊत, गणेश यादव, पंकज विष्णू, सुनील गोडबोले, शिवानी बने, सायली पाचपुते आणि गौरवी महांगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. श्री. भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते नुकतेच ‘संडे १९९६’च्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या निमित्ताने भरतशेठ गोगावले यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.
चित्रपटाच्या संकल्पनेविषयी बोलताना निर्मात्या नीलांबरी विक्रांत म्हणाल्या, ‘‘संडे १९९६’च्या माध्यमातून आम्ही केवळ रहस्यकथा सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही, तर काळ, नाती आणि त्याच्याशी संबंधित माणसाच्या आयुष्यातील भूतकाळाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला आहे.’
दिग्दर्शक जीवन चव्हाण यांनी चित्रपटाच्या निर्मितीतील आव्हान स्पष्ट करताना सांगितले, ‘संडे १९९६’ची कथा मांडताना आमच्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे रहस्य शेवटपर्यंत टिकवून ठेवतानाच त्यामागील भावनिक नात्यांनाही योग्य न्याय देणे. प्रेक्षकांनी केवळ कथा अनुभवू नये, तर त्यासोबत कथेतील प्रत्येक क्षणाची अनुभूती घ्यावी, अशी आमची इच्छा आहे.’
‘संडे १९९६’ची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे या कथेला लाभलेली निसर्गरम्य कोकणाची पार्श्वभूमी. कोकणाचा निसर्ग जितका सुंदर आणि मनमोहक आहे, तितकाच तो आपल्या कुशीत अनेक रहस्ये आणि गूढ कथा दडवून ठेवतो. याच निसर्गरम्य आणि गूढ वातावरणाचा प्रभावी वापर चित्रपटात करण्यात आला आहे.
काळाची चक्रे जेव्हा उलटी फिरतात, तेव्हा वर्तमानात जगणाऱ्या माणसाचे आयुष्यही बदलून जाते, या मध्यवर्ती संकल्पनेवर ‘संडे १९९६’ची कथा आधारित आहे. त्यामुळे रहस्य, भावनिक नाती आणि कोकणच्या गूढ वातावरणाची सांगड घालत हा चित्रपट प्रेक्षकांना अनोखा आणि थरारक सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी सज्ज झाला आहे.