गडचिरोली
ashramshala-incident आश्रमशाळांमध्ये दुर्घटना घडल्यानंतर केवळ मुख्याध्यापक किंवा कर्मचार्यांवर कारवाई केली जाते. मात्र, आश्रमशाळांना अनुदान देताना तेथील सोयी-सुविधा, विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आवश्यक उपाययोजनांची पाहणी करण्याची जबाबदारी संबंधित प्रकल्प अधिकार्यांची असते. प्रकल्प अधिकारी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत नसल्यामुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे. त्यामुळे जपतलाई घटनेप्रकरणी सुरुवातीला संबंधित प्रकल्प अधिकार्यांनाच निलंबित करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव ठाकरे) जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांनी आज घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत केली आहे.
सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी शाळेला भेट दिली. मात्र त्यांनी मृतक विद्यार्थिनींच्या कुटूंबीयांशी संवाद साधून त्यांना कुठलीही आर्थिक मदत केली नाही. केवळ शाळेच्या कर्मचार्यांवर कारवाईचा बडगा उभारून प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही, असेही गेडाम म्हणाले. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी शासनाने आदिवासी प्रकल्प अधिकार्याला निलंबित करावे, त्याशिवाय प्रशासकीय अधिकारी सुधारणार नसल्याचेही शिवसेना प्रमुख गेडाम म्हणाले.