शिमला,
rains in himachal pradesh हिमाचल प्रदेशातील मान्सूनमुळे निर्माण झालेले संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत आहे. राज्यात २५९ रस्ते बंद पडले असून दरडी कोसळणे आणि पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये १५७ जणांचा बळी गेला आहे. ‘राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षा’च्या अहवालानुसार, सततच्या पावसामुळे सुमारे ९०० मालमत्ता आणि सार्वजनिक सुविधांचे नुकसान झाले असून याचे आर्थिक मूल्य अंदाजे ८८६ कोटी रुपये इतके आहे.

३० जून ते ९ ऑगस्ट या कालावधीचा आढावा घेणाऱ्या या अहवालानुसार, दरडी कोसळणे आणि अचानक आलेल्या पुरामुळे सुमारे ६८ जणांचा मृत्यू झाला तर ८९ जण रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले. सुमारे २५७ लोक बेपत्ता आहेत. दरम्यान, हवामान विभागाने पाच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केल्यामुळे हिमाचलपुढील संकट अद्याप संपलेले नाही, असेच चित्र दिसत आहे. संपूर्ण राज्यात वीजपुरवठ्यावरही परिणाम झाला असून कुल्लू आणि मंडी हे जिल्हे सर्वाधिक बाधित झाले आहेत. सुमारे १६१ रोहित्रे एका आठवड्याहून अधिक काळापासून बंद पडले आहेत. यामध्ये मंडी जिल्ह्यात सर्वाधिक ७७ रोहित्रांचा समावेश आहे. त्यानंतर शिमला ४३ आणि कुल्लूत (४०) रोहित्र ठप्प झाले आहेत.
हिमाचलमध्ये या काळात दरवर्षी होणाऱ्या अविरत पावसामुळे कुल्लू परिसरातील नद्या आणि ओढ्यांच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली आहे. डोंगरावरून कोसळणारा मलबा आणि अचानक आलेल्या पुराच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या गाड्या व तात्पुरते पूल यांची दृश्ये अत्यंत भयावह आहेत.
रस्ते पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असले, तरी डोंगराळ भागात होणाऱ्या नवीन दरडी कोसळण्याच्या घटना आणि मुसळधार पाऊस यामुळे अडथळे निर्माण होत आहेत.
कुल्लू आणि मंडीला सर्वाधिक फटका
भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे मंडी-कुल्लू या महत्त्वाच्या महामार्गासह सुमारे २५९ रस्त्यांवरील वाहतूक बंद पडली. यात मंडी जिल्हा सर्वाधिक बाधित झाला असून तेथे १२० रस्ते बंद आहेत. त्यानंतर चंबा ४२, कुल्लू (४०) आणि शिमला ३० या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.
पाणी पुरवठ्यावरपरिणाम
या समस्यांमध्ये भर म्हणून, संपूर्ण हिमाचलमध्ये पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, ५४ पाणीपुरवठा योजना बाधित झाल्या आहेत. सर्वाधिक ३३ बाधित योजनांची नोंद शिमला येथे झाली असून