नागपुरात ढोल-ताशांचा तालबद्ध गजर घुमू लागला

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
पराग मगर

नागपूर,
dhol tasha गणरायाच्या आगमनाला अवघा महिना उरला असताना नागपूरच्या वातावरणात उत्सवाचे रंग भरू लागले आहेत. गणेशभक्तांच्या उत्साहाला आता ढोल-ताशांच्या तालबद्ध सरावाची साथ मिळू लागली आहे. सायंकाळ होताच शहरातील विविध भागांत ढोल-ताशांचा तालबद्ध आवाज घुमू लागला आहे. गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये आपली खास वादनशैली सादर करण्यासाठी पथकांची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
 
 
dhol tasha
 
काही वर्षांपूर्वी ढोल-ताशा पथक म्हटले की मुंबई आणि पुण्याचेच नाव प्रामुख्याने घेतले जायचे. शिक्षण किंवा नोकरीनिमित्त या शहरांमध्ये गेलेले नागपूरचे अनेक युवक, तेथील पथकांमध्ये सहभागी होत वादनाची कला आत्मसात करीत. मात्र, आता ही परंपरा नागपुरातही रुजली असून शहरात ढोल-ताशा पथकांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
 
सध्या नागपुरात वास्तव्यास असलेले अनिरुद्ध देशपांडे यांनी पुण्यात अनेक वर्षे ढोल-ताशा पथकात वादन केले होते. नागपुरातही अशीच समृद्ध वादनसंस्कृती निर्माण व्हावी, या उद्देशाने त्यांनी काही मित्रांच्या सहकार्याने ‘स्वराज्य गर्जना’ या ढोल-ताशा पथकाची स्थापना केली. या पथकापासून प्रेरणा घेत अनेक युवकांनी शहरात स्वतंत्र पथके उभी केली. विशेष म्हणजे, एकमेकांमध्ये स्पर्धा करण्याऐवजी या पथकांनी एकत्र येत नागपुरात ढोल-ताशा संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यातून ढोल-ताशा महासंघाची स्थापना झाली. महासंघाच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमही राबविले जातात. त्यामुळे ढोल-ताशा वादन हे केवळ उत्सवांपुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकीचे माध्यमही बनले आहे.
 
पथकांचे ‘शिव’स्वरूप!
नागपुरातील ढोल-ताशा पथकांच्या नावांमधून छत्रपती शिवाजी महाराजांप्रति असलेली श्रद्धाही प्रकर्षाने जाणवते. महासंघात स्वराज्य गर्जना, शिवगर्जना, शिवप्रतिष्ठा, शिवमुद्रा, आई जगदंबा, कलावंत, गजवक्र, जगदंब, नादअस्त्र, बेधुंद, ब्रह्मनाद, भगवा, भवानी, योद्धा, राजमुद्रा, राष्ट्रवंदना, विघ्नराजे, विठू-माऊली, शिव अनंत, शिव जगदंब, शिव संस्कृती, शिवराजे, शिवरुद्र, शिवसाम्राज्य, शिवशक्ती, शिवस्वरूप, शिवाज्ञा, शिवारंभ, श्री काळरुद्र, श्री शंभुराजे, श्री स्वराज्य रक्षक, साईमुद्रा, हिरकणी मावळे आदी ढोल-ताशा व ध्वजपथकांचा समावेश आहे. बहुतेक पथकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिरसावंद्य मानत, त्यांच्या पराक्रम, स्वराज्य आणि संस्कृतीशी संबंधित नावे स्वीकारली आहेत. त्यामुळे ढोल-ताशांचा निनाद केवळ वादन न राहता त्यातून शिवविचार आणि स्वराज्याची प्रेरणाही जागविली जात आहे.
 
 
जागेच्या अडचणीवर मात; तालमींना सुरुवात
गणेशोत्सव, शिवजयंती यांसह विविध उत्सवांमध्ये ढोल-ताशा पथकांची सलामी पाहणे आणि ऐकणे ही नागपूरकरांसाठी पर्वणी ठरते. त्यामुळे गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या साधारण महिनाभर आधीच पथकांच्या तालमींना सुरुवात होते. शहरातील शाळा-महाविद्यालयांची मैदाने, मोकळ्या जागा आणि उपलब्ध सार्वजनिक ठिकाणी वादक सराव करतात. मात्र, ढोल-ताशांचा आवाज काही भागांतील नागरिकांसाठी त्रासदायक ठरतो. त्यामुळे काही ठिकाणी पथकांच्या सरावाला नागरिकांनी आक्षेप घेतल्याचे प्रकारही घडले आहेत. जागेचा अभाव आणि ध्वनिप्रदूषणाच्या प्रश्नांमुळे पथकांसमोर आव्हाने उभी राहतात. तरीही उपलब्ध जागांचा शोध घेत आणि वेळेचे नियोजन करीत पथकांनी सराव सुरू केला आहे.
 
लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत उत्साह
ढोल-ताशा पथकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील वादकांचे वय. चिमुकल्यांपासून ते साठीतील ज्येष्ठांपर्यंत विविध वयोगटांतील नागरिक या पथकांमध्ये सहभागी होतात. एका पथकात साधारण ३५ ते ४० ढोलवादक, १० ते १५ ताशावादक, सुमारे १० ध्वजधारक आणि तेवढेच झांजवादक असतात. त्यामुळे एका वादनात जवळपास ५० ते ६० जण एकाच तालात सहभागी होतात. ढोलाचा दमदार ठेका, ताशांचा गजर, झांजांचा नाद आणि भगव्या ध्वजांची डौलदार उंची यामुळे गणरायाच्या आगमनाची चाहूल नागपूरकरांना आतापासूनच लागली आहे. येत्या काही दिवसांत सरावाचा हा निनाद आणखी वाढणार असून, गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये नागपूरच्या रस्त्यांवर ढोल-ताशांचा हा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे.