फिस्कुटी परिसरात दोन टस्कर हत्तींचा धुमाकूळ

शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
मूल
tuskers-wreak-havoc सावली तालुक्यातून मूल तालुक्यातल्या फिस्कुटी गाव परिसरात दाखल झालेल्या दोन टस्कर हत्तींमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. हत्तींच्या धुमाकुळामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाने बचाव पथकांच्या माध्यमातून हत्तींना जंगलाच्या दिशेने पिटाळून लावण्यासाठी प्रयत्न केले आहे.
 
mul
 
9 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास सावली तालुक्यातून दोन टस्कर हत्ती मूल तालुक्यातील फिस्कुटी येथील महाकाली मंदिर परिसरात दाखल झाले. हत्ती मंदिर परिसरात आल्याची माहिती मिळताच नागरिक व वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी त्यांना परिसरातून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळानंतर हे दोन्ही हत्ती पुन्हा फिस्कुटी परिसरात परतले. दरम्यान, सकाळी 11 वाजताच्या सुमारास फिस्कुटी परिसर तसेच चिचाळा मार्गावर दोन हत्ती नागरिकांना दिसले. या दोन टस्कर हत्तींच्या हालचालीदरम्यान फिस्कुटी येथील महाकाली मंदिर परिसरातील त्रिशूळ वाकल्याचे निदर्शनास आले. हत्ती मंदिर परिसरात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हत्तींच्या हालचालीमुळे शेती व मानवी वस्त्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन वनविभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या.
घटनेची माहिती मिळताच पोंभुर्णा वनपरिक्षेत्राधिकारी राखुंडे तसेच सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू पथके घटनास्थळी दाखल झाली. पोंभुर्णा वनविभागाच्या वनपरिक्षेत्राधिकारी राखुंडे व लांडगे यांनी तीन टीम तयार करून हत्तींना सुरक्षितपणे परिसरातून बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. वनविभागाच्या पथकांनी हत्तींना जंगलाच्या दिशेने हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक झालेले दोन्ही टस्कर हत्ती फिस्कुटी परिसरातच ठाण मांडून बसल्याने वनकर्मचार्‍यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले. हत्तींच्या हालचालींवर वनविभागाचे पथक सातत्याने लक्ष ठेवून होते.
आ. मुनगंटीवार यांनी वनाधिकार्‍यांना दिल्या सूचना
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फिस्कुटीचे सरपंच नितीन गुरनुले यांनी तातडीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच आ. मुनगंटीवार यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत, वनविभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला. त्यांनी चंद्रपूर जिल्हा वनसंरक्षकांना परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळविण्याच्या सूचना दिल्या. वनविभागाच्या पथकांनी दिवसभर अथक प्रयत्न केल्यानंतर अखेर 10 ऑगस्ट रोजी रात्री 2.30 वाजताच्या दरम्यान दोन्ही टस्कर हत्तींना फिस्कुटी परिसरातून चांदापूर मार्गे जंगलाच्या दिशेने पिटाळून लावण्यात यश मिळविले. हत्ती परिसरातून दूर गेल्यानंतर शेतकरी, नागरिक तसेच वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.