दुलीपमध्ये वैभवची अग्निपरीक्षा!

    दिनांक :11-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
vaibhav faces a trial by fire भारतीय क्रिकेटमधील युवा चेहरा वैभव सूर्यवंशी आता दुलीप ट्रॉफीच्या आगामी आव्हानासाठी सज्ज झाला आहे. अवघ्या १५व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वैभवची २०२६-२७ च्या दुलीप ट्रॉफीसाठी पूर्व विभागाच्या उपकर्णधारपदी निवड झाली आहे. इंग्लंड दौऱ्यातील पदार्पणानंतर झिम्बाब्वेविरुद्ध दमदार कामगिरी करणाऱ्या वैभवसमोर आता लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान आहे.
 
vaibhav faces a trial by fire
 
दुलीप ट्रॉफीची तयारी करताना वैभवने आपल्या सरावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. नेटमध्ये फलंदाजी करताना तो प्रामुख्याने चेंडूचा बचाव करण्याच्या तंत्रावर भर देताना दिसत आहे. त्याचबरोबर आक्रमक फटके खेळण्यावरही तो मेहनत घेत आहे. या व्हिडिओला त्याने ‘तयारी’ असे कॅप्शन दिले आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजीसाठी ओळख निर्माण केल्यानंतर आता वैभव लाल चेंडूच्या क्रिकेटमधील आपली फलंदाजी अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे.
 
झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत वैभवने आपल्या फलंदाजीची ताकद दाखवून दिली होती. इंग्लंड दौऱ्यात अपेक्षित कामगिरी करता न आल्याने त्याच्यावर टीका झाली होती. मात्र झिम्बाब्वेविरुद्ध त्याने जोरदार पुनरागमन करत तीन टी-२० आंतरराष्ट्रीय डावांमध्ये १५१ धावा केल्या. या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरताना त्याने ५०.३३ ची सरासरी आणि १९६.१० चा स्ट्राइक रेट नोंदवला. एका डावात त्याने ८१ धावांची खेळीही केली. या प्रभावी कामगिरीच्या जोरावर त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
 
आता झिम्बाब्वे मालिकेतील हा फॉर्म दुलीप ट्रॉफीतही कायम ठेवण्याचे वैभवचे लक्ष्य आहे. मात्र लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये त्याची आतापर्यंतची कामगिरी फारशी प्रभावी राहिलेली नाही. त्यामुळे आगामी स्पर्धा त्याच्यासाठी स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची महत्त्वाची संधी मानली जात आहे.
 
दरम्यान, दुलीप ट्रॉफीसाठी पूर्व विभागाच्या संघाची धुरा ईशान किशनकडे सोपवण्यात आली आहे. ईशान संघाचे कर्णधारपद भूषवणार असून वैभव सूर्यवंशी त्याचा उपकर्णधार असेल. दुलीप ट्रॉफीला २३ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून पूर्व विभागाचा पहिला सामना ईशान्य विभागाविरुद्ध होणार आहे.
 
वैभवने आतापर्यंत आठ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्याच्या १२ डावांमध्ये १७.२५ च्या सरासरीने २०७ धावा आहेत. त्यामुळे दुलीप ट्रॉफीच्या माध्यमातून लाल चेंडूच्या क्रिकेटमधील ही आकडेवारी सुधारण्याची संधी त्याच्यासमोर आहे. एका बाजूला झिम्बाब्वेतील १५१ धावांचा आत्मविश्वास आणि दुसरीकडे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सुधारण्याची गरज, अशा पार्श्वभूमीवर वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.