मुंबई
vijaysinh deshmukh अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. नरेंद्र पाटील यांनी देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत त्यांच्या बदलीची मागणी केली होती. या मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दखल घेतल्यानंतर अखेर विजयसिंह देशमुख यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अविनाश रणखांब यांची महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महामंडळाचा कारभार संथ ठेवल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी विजयसिंह देशमुख यांच्यावर केला होता. तसेच महामंडळाचे पोर्टल बंद ठेवण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर देशमुख यांच्या बदलीची मागणी नरेंद्र पाटील यांनी केली होती. अध्यक्ष आणि एमडी यांच्यातील हा वाद त्यानंतर राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता.
नरेंद्र पाटील यांनी विजयसिंह देशमुख यांच्यावर ‘मराठाद्वेषी अधिकारी’ असल्याची टीकाही केली होती. देशमुख यांच्या कारभारामुळे मराठा समाजातील तरुण उद्योजकांचे मोठे नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला होता. एमडी देशमुख यांच्या कार्यपद्धतीविरोधात मराठा समाजातील उद्योजकांमध्येही नाराजी असल्याचे सांगितले जात होते. या नाराजीचीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेतल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
नरेंद्र पाटील यांनी नुकताच पाच जिल्ह्यांचा दौरा केला होता. या दौऱ्यानंतर महामंडळाच्या कामकाजाबाबतचा अहवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला होता. महामंडळाकडून मंजूर झालेल्या तरुण उद्योजकांचे एलवाय अचानक रद्द करण्यात आल्यानेही देशमुख यांच्या विरोधात मोठी नाराजी निर्माण झाल्याचे या पार्श्वभूमीवर सांगितले जात होते.
मराठा समाजातील तरुण उद्योजकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नरेंद्र पाटील यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले होते. या भेटीदरम्यान त्यांनी महामंडळाचे एमडी विजयसिंह देशमुख यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर नरेंद्र पाटील यांनी देशमुख यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करत त्यांना ‘मराठाद्वेषी अधिकारी’ असल्याचा आरोप केला होता.महामंडळाच्या कारभाराचा फटका मराठा समाजातील तरुण उद्योजकांना बसत असल्याचा दावा करत नरेंद्र पाटील यांनी या संपूर्ण परिस्थितीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही सादर केला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागणीची दखल घेत देशमुख यांच्या बदलीचा निर्णय घेतला असून, आता अविनाश रणखांब हे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नवे व्यवस्थापकीय संचालक असतील.