मित्राच्या वाढदिवसालाच हिरावले दोन मित्र : वेगाशी स्पर्धा करणे भोवले

उभ्या ट्रकला भरधाव कारची धडक; दोन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू, एक गंभीर

    दिनांक :12-Aug-2026
Total Views |
नागपूर
racing-proves-fatal मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन मित्रांवर काळाने घाला घातला. मस्तीच्या नादात भरधाव वेगाने कार चालवत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन मित्रांचा मृत्यू झाला, तर कारचालक गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास कलमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा बायपास येथे घडली. मृतांमध्ये भौमिक अमोल लारोकार आणि पारडी येथील सागर संजय मेलवाणी (१७) यांचा समावेश आहे. तर मिहिर आनंद बेहार (१७) हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

speed
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लॉट क्रमांक ३६, सुभाषनगर येथील मिहिर आनंद बेहार याचा मित्र भौमिक लारोकर (१८) तसेच पारडी येथील सागर संजय मेलवाणी यांच्यासह अन्य मित्र जयचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर पडले होते. नागपूरबाहेर जाऊन वाढदिवस साजरा करण्याचे त्यांनी ठरविले होते. काही वेळ त्यांनी जयची वाट पाहिली. मात्र तो वेळेत न आल्याने त्यांनी कारमधून फेरफटका मारण्याचा निर्णय घेतला. मिहिर कार चालवत होता, तर भौमिक आणि सागर त्याच्या मागील सीटवर बसले होते. मिहिरने भरधाव वेगाने कार चालविण्यास सुरुवात केली. पहाटेच्या सुमारास वेगाशी खेळ करण्याच्या नादात कार चालवित असतानाच भरतवाडा बायपासजवळ अचानक त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की कार अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर भौमिक आणि सागर यांना मृत घोषित केले. मिहिरवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कळमना पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात, अल्पवयीन असलेल्या मिहिरकडे कार चालविण्याचा परवाना नाही. तरीही त्याने आणली होती. याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. तो अल्पवयीन असताना त्याला कार चालविण्याची परवानगी वडिलांनी कशी दिली?, याबाबतही पोलिस चौकशी करीत आहेत. मुलांच्या हट्टापायी पालकांनी त्यांना वाहन चालविण्याची परवानगी दिल्यामुळेच एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते, हे या भीषण अपघाताने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
सुदैवाने वाचला जय
जय याचा वाढदिवस साजरा करण्यासाठीच तीनही मित्र एकत्र जमले होते. काही वेळातच जय येणार होता. मात्र, जयला येण्यास उशिर झाला. तो उशिरच जयचा जीव वाचवून गेला. जर जय वेळेवर आला असता तर कदाचित कारमध्ये तोसुद्धा असता. दुर्दैवाने या अपघातात तोही साडपला असता. परंतु, दैव बलवत्तर म्हणून जय थोडक्यात वाचला.
वडिलावर होणार गुन्हा दाखल?
कायद्यानुसार अल्पवयीन मुलाच्या हातात वाहन दिल्यास वडिलांवर कारवाई करण्यात येते. त्यानुसार आता मिहिरच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.