पन्ना,
Diamond Found in Panna पन्नामध्ये पुन्हा एकदा एका मजुराचे नशीब फळफळले आहे. सरकोहा येथील एका खाजगी हिऱ्याच्या खाणीत काम करणाऱ्या अखिलेश पाल या मजुराला खोदकाम करताना १७-कॅरेटचा एक दुर्मिळ हिरा सापडला आहे. या वृत्ताने परिसरातील कामगार आणि रहिवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या मौल्यवान हिऱ्याच्या मालकाने नियमानुसार तो पन्ना डायमंड ऑफिसमध्ये जमा केला आहे. हा हिरा उत्कृष्ट दर्जाचा असून त्याचे अंदाजित मूल्य ५० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या हिऱ्यामध्ये सात भागीदार आहेत. याचा अर्थ असा की, लिलावातून मिळणारी रक्कम सर्व भागीदारांमध्ये त्यांच्या हिश्श्यानुसार विभागली जाईल. हिरा शोधणाऱ्या अखिलेश पाल या मजुरासाठी हा शोध एका मोठ्या आनंदाच्या बातमीपेक्षा कमी नाही. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोज कष्ट करणाऱ्या अखिलेशला आता घामाच्या थेंबातून घरात सुखाची पहाट येईल़. लिलावातून मिळणाऱ्या रकमेमुळे त्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल, अशी आशा आहे़.
हिरा कार्यालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, नियमांनुसार आगामी लिलावात या हिऱ्याचा लिलाव केला जाईल. लिलावातून मिळणाऱ्या रकमेतून १२ टक्के कपात करून उर्वरित रक्कम हिऱ्याच्या मालकाला दिली जाईल. त्यानंतर ही रक्कम भागीदारांमध्ये विभागली जाईल. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून पन्नामध्ये हिऱ्यांचे लिलाव न झाल्यामुळे हिऱ्यांचे मालक आणि मजूर निराश झाले आहेत. यासंदर्भात अधिकाऱ्याने सांगितले की, ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या लिलावात या हिऱ्यांचा समावेश केला जाईल. या लिलावात भारत आणि परदेशातील व्यापारी हिऱ्यांसाठी बोली लावतील.
पन्नाच्या भूमीने पुन्हा एकदा उंचावली प्रतिष्ठा
पन्ना हे देशभरात हिऱ्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. येथील उत्खननादरम्यान मजूर आणि लहान खाणकामगारांचे नशीब अनेकदा उजळले आहे. आता, या दुर्मिळ १७-कॅरेटच्या हिऱ्याने हिऱ्यांचे शहर असलेल्या पन्नाला पुन्हा एकदा चर्चेत आणले आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या लिलावाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत़ लिलावात या १७-कॅरेटच्या तेजस्वी, रत्न-दर्जाच्या हिऱ्याला किती किंमत मिळते हे पाहणे बाकी आहे.